भुसावळ रेल्वे स्थानकावर अनधिकृत विक्रेते व फुकट्या प्रवाशांवर धडक कारवाई

भुसावळ ( प्रतिनिधी ) –
भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाने अनधिकृत फेरीवाले व विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात धडक कारवाई करत खळबळ उडवून दिली. संयुक्त कारवाईत दोन अनधिकृत फेरीवाल्यांना ताब्यात घेण्यात आले असून १७ फुकट्या प्रवाशांकडून एकूण ८ हजार ४५० रुपये दंड वसूल करण्यात आला.

सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट तपासणी) पी. के. सिंग यांच्या नेतृत्वाखाली तिकीट तपासणी पथकाने स्थानकाच्या विविध फलाटांवर अचानक तपासणी मोहीम राबविली. यावेळी अनधिकृतपणे विक्री करणारे फेरीवाले आढळून आल्याने त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या फेरीवाल्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी रेल्वे सुरक्षा दलाकडे सुपूर्द करण्यात आले.

कारवाईदरम्यान अनधिकृत विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या ७ ट्रॉली, १४० खोमचे (हातगाड्या) आणि ८ प्लास्टिक बादल्या असा साहित्यसाठा जप्त करण्यात आला. जप्त साहित्य नियमांनुसार पार्सल कार्यालयात जमा करण्यात आले आहे.

दरम्यान, तिकीट तपासणीदरम्यान वैध तिकीट नसताना प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरही कठोर कारवाई करण्यात आली. नियमभंग करणाऱ्या प्रवाशांकडून दंड वसूल करून त्यांना समज देण्यात आली.

प्रवाशांची सुरक्षितता आणि स्थानकावरील शिस्त राखण्यासाठी अशा तपासणी मोहिमा यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच प्रवाशांनी केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी व रेल्वे नियमांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.