नाशिक, — नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात कडक सुरक्षेला छेद देत अमली पदार्थांची तस्करी झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. नियमित तपासणीदरम्यान कारागृह प्रशासनाने सुमारे १ लाख ७ हजार ८०० रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले असून, या प्रकरणी दोन कैद्यांविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पोलिस व कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे.

१० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ९.४० वाजता मंडल क्रमांक ७ मधील यार्ड क्रमांक १ व ४ येथे तपासणी सुरू असताना संशयास्पद हालचाली आढळून आल्या. तपासणीदरम्यान कैदी दिलीप कचरू सोळुंके याच्या झडतीत १०४ ग्रॅम चरस, ३१.५ ग्रॅम गांजा सदृश पदार्थ, ४ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) तसेच अमली पदार्थ सेवनासाठी वापरले जाणारे १५ रोलिंग पेपर आढळून आले.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैदी स्वप्नील दिनेश उनवणे याच्या सांगण्यावरून बाहेरील अज्ञात व्यक्तीने हे पदार्थ बेकायदेशीर मार्गाने कारागृहात पोहोचवले असल्याचा संशय आहे. उंच तटबंदी व चोख पहारा असतानाही हे पदार्थ आत कसे आले, याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.
या प्रकरणी कारागृह हवालदार सुनील सोमा रोकडे यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिलीप सोळुंके व स्वप्नील उनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, बाहेरील अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू आहे.
तस्करीमागे कारागृहातील कोणाचे संगनमत आहे का, पदार्थ भिंतीवरून फेकण्यात आले का किंवा नव्याने दाखल झालेल्या कैद्यांमार्फत आत आले का, यासह विविध शक्यता तपासल्या जात आहेत. राज्यातील उच्च सुरक्षा असलेल्या कारागृहांपैकी एक असलेल्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात घडलेल्या या घटनेची वरिष्ठ पातळीवर दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. तपास पूर्ण होईपर्यंत अधिक माहिती जाहीर करण्यात येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


