उज्वला बागुल। भुसावळ

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात भुसावळ शहराची भूमिका बिनीची राहिली आहे. नाशिक विभागातील एकमेव ‘अ’ वर्ग नगरपालिका म्हणून भुसावळची ओळख आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक ४७ नगरसेवक येथून निवडून येतात. विधानपरिषद निवडणुकीत हा आकडा राजकीय चित्र पलटवणारा ठरताे. म्हणून जास्तीत जास्त नगरसेवक आपल्याच पक्षाचे निवडून यावे म्हणून येथे जिल्ह्याचे नेतृत्व करणारे नेतेही ताकद लावतात. पालिकेसाठी अलिकडेच जे मतदान झाले त्याची आकडेवारी गेल्यावर्षापेक्षा दाेन टक्के कमी आहे. मतदान कमी झाल्याने उत्कंठा शिगेला पाेहाेचली आहे. गेल्या वेळेला एकही जागा बिनविराेध झाली नव्हती. या वेळी मात्र, भाजपच्या तीन जागा बिनविराेध झाल्या आहेत. त्यात प्रभावशाली नगरसेवक म्हणून निर्मल काेठारी, नागराणी, परीक्षीत बऱ्हाटे यांचा समावेश आहे. तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी आमदार संताेष चाैधरी यांचे निकटवर्तीय व नात्यागाेत्यातील उमेदवारांनी माघार घेतली आहे. आजपर्यतच्या इतिहास या तिन्ही लाेकांनी कधीच माघार घेतलेली नाही. मात्र, या वेळी त्यांनी माघार घेऊनही चाैधरींकडून कुठलीच प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे ‘दया कुछ ताे गडबड है’ असे डायलाॅग भुसावळकरांना आठवताे आहे.
गेल्यावेळी काेठारींच्या प्रभागाने तारले
सन २०१८मध्य लाेकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमण भाेळे हे हाेते. त्यांच्या विराेधात राष्ट्रवादीचे माजी आमदार संताेष चाैधरी यांचे सुपूत्र सचिन चाैधरी हे जनाधार आघाडीचे उमेदवार हाेते. उमेश नेमाडे हे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत हाेते. त्यात मात्र, नेमाडे फारसे प्रभावी ठरले नव्हते. त्यामुळे भाेळे व चाैधरी यांच्यात काट्याची लढत झाली हाेती. त्यात प्रत्येक प्रभागात उन्नीस-बीसचा फरक हाेता. मात्र, फक्त निर्मल काेठारी यांच्या प्रभागात माेठी आघाडी भाजपला मिळाली हाेती. त्यामुळे भाजपला विजय मिळाला हाेता. परीक्षित बऱ्हाटे व नागराणी यांच्या वाॅर्डातही बऱ्यापैकी लिड भाजपला हाेता. त्याचे कारण म्हणजे तिन्ही जण ताकदीने निवडणूक लढवत हाेते. घराेघरी जास्तीत जास्त मतदान त्यांनी काढून घेतले हाेते. या वेळी मात्र, तसे चित्र फारसे दिसले नाही. त्यामुळे बिनविराेधचा डाव भाजपवर बुमरँग हाेऊ शकताे असे जाणकारांना वाटते आहे. भाजपेयींना मात्र तसे वाटत नाही.
अनिल चाैधरींमुळे भाजपला साेपी निवडणूक अवघड
भुसावळ पालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल हाेईलपर्यंत निवडणूक भाजपसाठी एकतर्फी हाेती. मात्र, माध्यमांशी बाेलताना राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय सावकारे यांनी बाेलताना आवेशात ‘काेण अनिल चाैधरी, ओळखत नाही?’ असे विधान केले. आणि इथून राजकारण खऱ्या अर्थाने फिरले. अर्थात, गेल्या दाेन्ही निवडणुकीत फारसे सक्रीय नसलेले अनिल चाैधरी हे सन २००५ सारखे पूर्ण ताकदीने कामाला लागले. त्यामुळे साेपी असलेली निवडणूक अखेरच्या टप्प्यात भाजपसाठी अवघड बनली. चाैधरींनी केलेल्या गंभीर आराेपांनाही सावकारे सडेताेड उत्तर देऊ शकले नाहीत. मतदानाची प्रक्रिया आटाेपल्यानंतरही सावकारेंसह त्यांच्या समर्थकांनी फारसे दावे केलेले नाहीत.
भाजपच्या बेल्टमध्ये मतदानात निरुत्साह
भुसावळात रेल्वे उत्तर भाग हा भाजपचा २० वर्षांपासून बालेकिल्ला मानला जाताे. मात्र, या वेळी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा दक्षिण भागातील असल्याने मतदानात फारसा उत्साह दिसला नाही. त्याचा परिणाम नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या मतदानावर हाेऊ शकताे असा अंदाज जाणकारांना वाटताे आहे. तसेच माजी लाेकनियुक्त नगराध्यक्ष रमण भाेळे, माजी उपनगराध्यक्ष प्रमाेद नेमाडे यांची फारसी सक्रीया या वेळी नव्हती. रेल्वेची झाेपडपट्टी तुटल्याने विखुरलेले गेलेले मतदार यांचे अपेक्षित न झालेले मतदान हा देखील उत्कंठेचा विषय आहे. मात्र, असे असले तरी कमळ फुलणार की तुतारी वाजणार? या प्रश्नाचे उत्तर जनमानसातून फिफ्टी फिफ्टी असेच येते आहे. बघू या आज गुलालाची उधळण काेण करताे ते?
शेवटी कालाय तस्मै नम! निवडून येणाऱ्याना आतापासून शुभेच्छा, व पराभूत हाेणाऱ्यांना भविष्यात निवडून येण्यासाठी शुभचिंतन ;


