न.पा. निवडणुकीचा दुसरा टप्पा शांततेत पार; भुसावळ येथे 51.29 टक्के, वरणगाव येथे 75.88 टक्के मतदान : मतमोजणी तयारी पूर्ण, प्रशासन सज्ज:


भुसावळ/वरणगाव :
न्यायालयाच्या आदेशानुसार वरणगाव नगरपरिषदेच्या दोन उमेदवारांसाठी घेण्यात आलेली नगरपरिषद निवडणुकीची दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया शनिवार, 20 डिसेंबर 2025 रोजी शांततेत पार पडली. या निवडणुकीत भुसावळ येथे 51.29 टक्के, तर वरणगाव येथे 75.88 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली.

भुसावळ
भुसावळ येथील प्रभाग क्रमांक 4 ब व 11 ब मध्ये एकूण 8381 मतदारांपैकी 4298 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे येथे 51.29 टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली. विशेष बाब म्हणजे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आपल्या कुटुंबासह मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवला.

भुसावळ येथे मतदानाची टक्केवारी दिवसभरात टप्प्याटप्प्याने वाढत गेली.
सकाळी 7.30 ते 9.30 या वेळेत 3.45 टक्के मतदान झाले, तेच दुपारी 1.30 वाजेपर्यंत 20.13 टक्क्यांवर पोहोचले. दुपारी 3.30 वाजेपर्यंत 32.84 टक्के मतदान झाले, तर दिवसअखेरीस एकूण मतदानाची टक्केवारी 51.29 टक्के नोंदवली गेली. यामध्ये 2316 स्त्री, 1982 पुरुष मतदारांचा समावेश होता.

वरणगाव
वरणगाव येथील प्रभाग क्रमांक 10 अ व ब मध्ये एकूण 3490 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून येथे 75.88 टक्के मतदान झाले, अशी माहिती अनिल पुरे यांनी दिली. भुसावळच्या तुलनेत वरणगावमध्ये मतदानाचा उत्साह अधिक असल्याचे चित्र दिसून आले.

मतमोजणीची तयारी पूर्ण
मतदानानंतर सर्व मतपेट्या सुरक्षित ठिकाणी जमा करण्यात आल्या आहेत. मतमोजणी रविवारी, 21 डिसेंबर 2025 रोजी भुसावळ येथे तहसील कार्यालयात, तर वरणगाव येथे नगरपालिका कार्यालयात होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

दरम्यान, उच्च मतदान टक्केवारीमुळे नागरिकांमध्ये लोकशाही प्रक्रियेबाबत असलेली जागरूकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. तसेच, विजयी मिरवणुका काढण्यास बंदी असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.