भुसावळ : शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारी उफाळून आल्याचे चित्र बुधवारी रात्री पाहायला मिळाले. जळगाव रोडवरील स्व. नारायण पाटील व्यापारी संकुलाजवळील पानटपरीवर रोकड लुटीच्या उद्देशाने आलेल्या चौघांपैकी एकाने प्रतिकार करणाऱ्या 39 वर्षीय व्यक्तीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली.

उल्हास गणेश पाटील (वय 39, रा. जुना सातारा, भुसावळ) हे पानटपरीवर उभे असताना दुचाकीवरून आलेल्या चौघा संशयितांनी गोंधळ घालत रोकड हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी उल्हास पाटील यांनी विरोध केल्याने एका संशयिताने सोबत आणलेल्या कट्ट्यातून गोळी झाडली. ही गोळी त्यांच्या उजव्या खांद्याजवळ लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.
गोळीबारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संशयित आरोपी पल्सर व मोपेडवरून घटनास्थळावरून पसार झाले.
दरम्यान, घटनेनंतर भुसावळ शहर पोलीस, बाजारपेठ पोलीस व जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. प्रत्यक्षदर्शी, सीसीटीव्ही फुटेज आणि खबर्यांच्या नेटवर्कच्या आधारे रात्री उशिरापर्यंत शहरातील विविध भागांतून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार ताब्यात घेतलेले संशयित अल्पवयीन असण्याची शक्यता असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.
या गोळीबाराच्या घटनेमुळे भुसावळ शहरात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये तीव्र घबराट पसरली आहे.


