भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने मतमोजणी प्रक्रियेबाबत आज दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी आढावा बैठक घेण्यात आली. ही बैठक तापी सभागृह येथे मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला सर्व मतमोजणी पर्यवेक्षक, सहायक मतमोजणी पर्यवेक्षक अधिकारी तसेच मतमोजणी कामासाठी नेमण्यात आलेले विविध कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मतमोजणी प्रक्रिया दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी तहसील कार्यालयातील शासकीय धान्य गोदाम येथे पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली. मतमोजणीस सुरुवात प्रथम टपाली मतदानाच्या मतमोजणीने होणार असून त्यानंतर ईव्हीएमद्वारे मतदानाची मतमोजणी करण्यात येणार आहे.
एकूण १४ टेबलवर मतमोजणी होणार असून सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी आपापली नेमून दिलेली जबाबदारी दक्षतेने व काळजीपूर्वक पार पाडावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
या बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी भुसावळ जितेंद्र पाटील, मंडळ अधिकारी प्रफुल्ल कांबळे, नायब तहसीलदार हेमंत गुरव, न.पा. भुसावळचे परवेज शेख तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


