आत्मसन्मान फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद – पुनम विजय फालक

भुसावळ (प्रतिनिधी) –

भुसावळ–बोदवड येथील आत्मसन्मान फाउंडेशनकडून सुरू असलेली मनोरुग्ण, मतिमंद, वंचित व पीडित व्यक्तींची निस्वार्थ सेवा खरोखरच कौतुकास्पद असून त्यांना जितके धन्यवाद द्यावेत तितके थोडे आहेत, असे प्रतिपादन नारी रत्न पुरस्कारप्राप्त, ताप्ती पब्लिक स्कूलच्या आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त व विद्यार्थीप्रिय शिक्षिका पुनम विजय फालक यांनी केले.

डॉ. विजय पाटील व त्यांचे कुटुंबीय, तसेच त्यांच्यासोबत कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर व सेवाभावी सेवकांचे कार्य अभिमानास्पद आहे. कोणत्याही प्रकारच्या भावनिक गुंतवणुकीची किंवा सन्मानाची अपेक्षा न ठेवता परिवाराने टाकून दिलेल्या मनोरुग्ण व पीडितांची मनोभावे सेवा करणे आजच्या काळात दुर्मीळ असल्याचेही त्यांनी नमूद केले. अशा अतुलनीय कार्याला समाजाने सढळ हाताने मदत करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी पुनम फालक कुटुंबासह उपस्थित होत्या. सुपुत्र जय फालक व सुपुत्री लावण्या फालक यांनी वाढपीचे काम करून मनोभावे सेवा केली. त्यांनी उपस्थितांची आपुलकीने भेट घेऊन विचारपूस केली तसेच आर्थिक मदतही दिली. या सेवाभेटीमुळे आम्ही धन्य झालो, अशी भावना व्यक्त करत त्यांनी फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांना सलाम केला.

कार्यक्रमप्रसंगी आत्मसन्मान फाउंडेशनचे सदस्य चरणसिंग पाटील व व्यवस्थापक रवी माळी उपस्थित होते.