मुक्ताईनगरमध्ये अतिवृष्टी निधी वाटपात लाखोंचा भ्रष्टाचार- आ. चंद्रकांत पाटील ;

मुक्ताईनगर :- चुकीच्या लोकांना नुकसान भरपाई; ‘झारीतील शुक्राचार्य कोण?’ पाटलांचा सवाल; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारामुक्ताईनगर प्रतिनिधी: अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतनिधी वाटपात मुक्ताईनगर तालुक्याच्या महसूल प्रशासनाने मोठा गैरव्यवहार करत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. संबंधित भ्रष्ट महसूल कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

जुलै ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे मुक्ताईनगर तालुक्यातील १९,०१६ शेतकऱ्यांसाठी शासनाने ₹२४ कोटी २१ लाख ४९ हजार ६३० रुपयांची मदत जाहीर केली होती. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असताना, महसूल प्रशासनाने निधी वाटपात गैरव्यवहार केल्याचा आरोप आ. पाटील यांनी केला. त्यांनी राजुरा गावाचे उदाहरण दिले:

सातबारावर नाव नसलेल्यांनाही रक्कम: काही शेतकरी सातबारा उताऱ्यावर लाभार्थी म्हणून नसतानाही, त्यांच्या नावे मदत निधी जमा करण्यात आला.जास्त शेतजमीन दाखवून अनुदान: काही शेतकऱ्यांच्या नावे प्रत्यक्षात कमी शेतजमीन असतानाही, जास्त जमीन दाखवून जास्त अनुदान लाटण्याचा प्रयत्न झाला.राजुरा गावात १३.४५ लाखांचा अपहार: राजुरा गावासाठी एकूण ₹१३ लाख ४५ हजार एवढी रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्यात आली, ज्यात मोठा अपहार झाला आहे.

आमदार पाटील यांनी माहिती दिली की, हे प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात येताच राजुरा येथील तलाठी यांनी थेट ८ लाख रुपये रोखीने भरले आहेत. एका कर्मचाऱ्याकडे एवढी रोख रक्कम आली कुठून, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणात खऱ्या लाभार्थ्यांना मदत न मिळाल्याचा ठपका ठेवत, “यामागे झारीतील शुक्राचार्य कोण?” असा प्रश्न आ. पाटील यांनी विचारला आहे. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री, महसूलमंत्री, जिल्हाधिकारी आणि सचिवांकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे.

मोटरसायकल

आमदार पाटील यांनी मागणी केली आहे की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून त्वरित एसआयटी (SIT) स्थापन करण्यात यावी. तसेच, विधानसभेतही आपण हा प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. ३१ तारखेला तक्रार देऊनही तहसीलदार, मुक्ताईनगर यांनी कोणतीही कारवाई न केल्यास, शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आ. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला.