भुसावळ (प्रतिनिधी): येथील विठ्ठल मंदिर परिसरातील रहिवासी व श्री खाटू श्याम भक्त सागर शिंदे यांनी पर्यावरण बचावाचा संदेश देत आज, शनिवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी, भुसावळ येथून सायकलीने खाटू श्याम (राजस्थान ) दर्शन यात्रेसाठी प्रस्थान केले.

प्रस्थानापूर्वी सागर शिंदे यांनी विठ्ठल मंदिरात पांडुरंगाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. त्यांच्या या यात्रेचा उद्देश पर्यावरण संवर्धन, आरोग्यदायी जीवनशैली आणि इंधन बचत हा असून, ते सायकलीने मजल दरमजल करीत शेकडो किलोमीटर अंतर पार करणार आहेत.
सागर शिंदे व त्यांचा परिवार हे श्रद्धाळू श्यामभक्त असून, त्यांच्या घरी नियमितपणे खाटू श्याम बाबांचा भजन कार्यक्रम आयोजित केला जातो. यावेळी सागर शिंदे यांना अजय पाटील , उमाकांत शर्मा (नमा ) ,सनी चौधरी ,मिलिंद कापडे , महेश सोनवणे , पवन शिंदे , यांचेसह मित्रपरिवार, नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी यांनी शुभेच्छा देऊन सुखरूप प्रवासासाठी आशीर्वाद दिले.
सागर शिंदे म्हणाले, “दैनंदिन जीवनात सायकलचा वापर केल्याने शरीर निरोगी राहते, इंधनाची बचत होते आणि पर्यावरणाचे रक्षण होते. सध्या हिवाळ्याचे आल्हाददायक वातावरण असल्याने या काळात सायकल प्रवास अधिक आनंददायी ठरतो. म्हणूनच मी खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी सायकलीने जाण्याचा संकल्प केला आहे.”
त्यांच्या या उपक्रमामुळे शहरात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून, युवकांना ‘पर्यावरणपूरक प्रवास करा, आरोग्य सांभाळा’ असा संदेश देण्यात आला आहे.


