पाचोरा – पाचोरा तालुक्यातील वाडी गावाजवळील शेवळे येथे एक धक्कादायक घटना घडली असून, जनाबाई माहूर पाटील (वय ८५) या वृद्ध महिलेची अज्ञात व्यक्तींनी लोखंडी रॉडने डोक्यात वार करून निर्घृण हत्या केली. ही घटना ५ जून रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्राप्त माहितीनुसार, जनाबाई पाटील या शेवळे येथे आपल्या मातीच्या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांचा मुलगा कृष्णराव माहूर पाटील हे शेजारील दुसऱ्या घरात राहत असून, गुरुवारी ते आपल्या मित्राच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त पाचोऱ्याला गेले होते. रात्री उशिरा परतल्यानंतर त्यांनी आई घरी आढळून न आल्याने शोध घेतला असता, त्या मृतावस्थेत आढळून आल्या.
मारेकऱ्यांनी वृद्धे च्या डोक्यात लोखंडी रॉडने दोन तीव्र वार करून हत्या केल्याचे आढळले. तसेच त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील सोन्याचे दोन बाळे चोरट्यांनी ओरबाडून नेल्याचे निष्पन्न झाले आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह पलंगाखाली टाकून त्यावर अंथरूण पांघरण्यात आल्याचे दिसून आले
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे. या अमानुष घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.


