नीलगायच्या धडकेत भुसावळचे बॉक्सिंग ट्रेनर स्टीफन डेव्ह यांचा मृत्यू ; अपघातात जावई गंभीर जखमी –

भुसावळ

कंडारी गावातील नागसेन कॉलनीचे रहिवासी आणि प्रसिद्ध बॉक्सिंग ट्रेनर स्टीफन डेव्ह यांचा नीलगायच्या धडकेत झालेल्या अपघातात मृत्यू झाला. त्यांचे जावई अहिरे हे देखील या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

ही दुर्दैवी घटना शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. स्टीफन डेव्ह आणि त्यांचे जावई अहिरे बुलेट मोटारसायकल (क्रमांक एम एच -१२-एस एच-१७१६) ने छत्रपती संभाजीनगरकडे निघाले होते. दरम्यान, जामनेर रोडवरील पानाच्या कुऱ्हे गावाच्या पुढे अचानक नीलगायांचा कळप रस्त्यावर आल्याने मोटरसायकलचा अपघात झाला.

अपघातात स्टीफन डेव्ह यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दोघेही रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत असताना स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. मात्र स्टीफन डेव्ह यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

त्यांचा जावई अहिरे हे जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. स्टीफन डेव्ह यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद कोणत्याही पोलीस ठाण्यात झाल्याचे आढळून आले नाही.

स्टीफन डेव्ह हे रेल्वे सेवेत कार्यरत होते. ते उत्कृष्ट बॉक्सर होते आणि एक कुशल बॉक्सिंग प्रशिक्षक म्हणून त्यांचा भुसावळ व परिसरात विशेष लौकिक होता. त्यांच्या अकस्मात निधनामुळे क्रीडाक्षेत्रात आणि त्यांच्या परिचयाच्या वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.