खंडवा – शनिवार रोजी दुपारी ट्रेन क्रमांक 11072 कामायनी एक्सप्रेसला बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. भोपाल येथील जीआरपी कंट्रोलकडून दुपारी 12:48 वाजता ही माहिती मिळाली, त्यानंतर तात्काळ सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली.

कामायनी एक्सप्रेस दुपारी 12:59 वाजता मध्य रेल्वे भुसावळ मंडळाततील खंडवा रेल्वे स्थानकात पोहोचली. ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर थांबवण्यात आली आणि आरपीएफ, जीआरपी, स्थानिक पोलिस, श्वान पथकासह सर्व संबंधित यंत्रणांनी संपूर्ण रेल्वेची तपासणी सुरू केली. तपासणी दरम्यान स्थानक परिसर पूर्णतः सील करण्यात आला होता. कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. तपासणीदरम्यान आरपीएफचे वरिष्ठ अधिकारी तसेच खंडवा स्थानकाचे आयपीएफ यावेळी प्रत्यक्ष उपस्थित होते.

श्वान पथक आणि पोलिसांनी संपूर्ण ट्रेनची सखोल तपासणी केल्यानंतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे ही धमकी पोकळ ठरली असून ट्रेनला पुढील प्रवासासाठी सुरक्षित घोषित करण्यात आले. ट्रेन दुपारी 1:53 वाजता खंडवा स्थानकावरून पुढील मार्गासाठी रवाना झाली.
ज्या क्रमांकावरून ही धमकी देण्यात आली, तो क्रमांक आता पोलिसांच्या विशेष लक्षात ठेवण्यात आला आहे आणि पुढील चौकशी सुरू आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये क्षणिक अस्वस्थता निर्माण झाली होती, मात्र वेळीच केलेल्या तत्पर कारवाईमुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.



