अमळनेरनजिक मालगाडी रुळावरून घसरली; सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प –


अमळनेर – भुसावळहून नंदुरबारकडे जाणारी कोळसा भरलेली मालगाडी प्रताप महाविद्यालयाजवळ गुरुवारी (१५ मे) दुपारी दोनच्या सुमारास रुळावरून घसरल्याची घटना घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी मालगाडीचे डबे तसेच रेल्वे मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या मालगाडीतून रेल्वे इंजिन कोर्ट, पोल ट्रॅक, सिमेंट स्लिप पार्ट्स तसेच ओएचई (ओव्हरहेड इलेक्ट्रिक) लाईनचे साहित्य वाहून नेले जात होते. अपघातानंतर अनेक डबे रुळाखाली गेल्याने ओएचई लाईन, पोल ट्रॅक व स्लिप पार्ट्स या महत्त्वाच्या साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी शेजारील ट्रॅकही खराब झाला असून, सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावरील दोन्ही दिशांची वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली आहे.

घटना स्टेशनपासून काही अंतरावर घडल्यामुळे रेल्वे प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू असून, ट्रॅक क्लिअरन्स व वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, रेल्वे अधिकाऱ्यांनी अपघाताच्या नेमक्या कारणावर मौन बाळगले असून, यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यास नकार दिला आहे.

या अपघातामुळे प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, प्रवाश्यांचे हाल होणार आहेत. प्रशासनाकडून मदत कार्य सुरु असले तरी रेल्वे सेवा पूर्ववत होण्यास काही वेळ लागणार असल्याचे संकेत आहेत.