भुसावळातील एस.टी.आगारप्रमुखांचे दालन पाच लाखांच्या थकबाकीपोटी सील – पालिकेची वसुली मोहिम : दोन लाखांचा धनादेश दिल्यानंतर सील उघडले

भुसावळ : नगरपालिकेने थकीत मालमत्ताकर वसुलीसाठी आता धडक वुसली मोहिम सुरू केली आहे. मंगळवारी पालिकेने पाच लाख दहा हजार रुपयांच्या थकीत घरपट्टीपोटी एस.टी.महामंडळाच्या भुसावळ बसस्थानकातील आगारप्रमुखांचे दालन तसेच कर्मचार्‍यांचे कार्यालय सील केले. या कारवाईनंतर अवघ्या दोन तासांत एस.टी.महामंडळाने दोन लाख सात हजार 945 रुपयांचा धनादेश दिला. सोबतच उर्वरित रक्कम आठवड्याभरात देण्याचे आश्वासन दिल्याने सील काढण्यात आले. दरम्यान या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पालिकेची धडक वसुली मोहिम
पालिकेने थकबाकी वसुलीसाठी मोहिम उघडली आहे. भुसावळ एस.टी.महामंडळाकडे चार लाख 64 हजार 472 रुपये व 10 टक्के दंडाची 46 हजार 574 रुपये अशी एकूण 5 लाख 10 हजार 919 रुपयांची घरपट्टी पाच वर्षांपासून थकीत आहे. ही थकबाकी भरण्यासाठी पालिकेने एसटी महामंडळाला वारंवार नोटीस दिली. सक्षम अधिकार्‍यांसोबत भेट घेवून चर्चाही केली मात्र थकबाकीचा भरणा होत नसल्याने अखेर मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी परवेज अहमद, प्रशासकिय अधिकारी अजीत भट, दीपक आहिरे, मुकेश पाटील, आस्थापना प्रमुख वैभव पवार, कारकून जितेंद्र झांबरे यांच्या पथकाने एस.टी. बसस्थानकातील आगारप्रमुख व कर्मचार्‍यांचे दालन सील केले.

या कारवाईमुळे खळबळ उडाली. या प्रकारानंतर महामंडळाने अवघ्या दोन तासांमध्ये दोन लाख सात हजार 945 रुपयांचा धनादेश दिला. आगामी आठवडेभरात उर्वरित रक्कम भरणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर पालिकेने लावलेले सील काढण्यात आले. दरम्यान याच धर्तीवर पालिका प्रशासनाकडून धडक कारवाई केली जाणार असल्याने थकीत करदात्यांनी आपल्या रक्कमेचा भरणा तत्काळ करावा, असे आवाहन मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी केले आहे.