मुक्ताईनगर – येथील गोड आवाजाची ईश्वरी देणगी लाभलेली गायिका तनिष्का रुले हीचे अप्रतिम संगीत सौंदर्याने नटलेले मराठी गीत नवे रंग आज रोजी सर्व म्युझिक प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहे. तनिष्काने दोन वर्षापूर्वी सपनो की उडान हे हिंदी गीत प्रदर्शित करून संगीत क्षेत्रात गायिका म्हणून पदार्पण केले होते. संगीत क्षेत्रातील तिच्या त्या पहिल्याच गीताच्या अप्रतिम यशानंतरचे हे तिचे दुसरे एक सुंदर असे मराठी निसर्ग गीत आहे.

गोड आवाजाची ईश्वरदत्त देणगी-
तनिष्काला लहानपणापासूनच गायनाची आवड होती. तिला गोड आवाजाची ईश्वरदत्त देणगी लाभलेली आहे हे तिचे संगीत शिक्षक श्री.समीर कुलकर्णी यांच्या लक्षात आले. प्राथमिक शिक्षण घेतांना गायनाचे शिक्षणही तिने त्यांच्याकडेच घेतले. आता ती संगणक अभियांत्रीकीचे शिक्षण घेत आहे.
मुलीसाठी वडील बनले गीतकार-
तनिष्काचे वडिल श्री.श्यामकांत रुले हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) पुणे येथे विषय समिती सदस्य असून एक प्रयोगशील शिक्षक, अभ्यासू लेखक व कवी आहेत. मुलीला लाभलेली गोड आवाजाची ईश्वरदत्त देणगी आणि गायनाप्रती असलेली समर्पण भावना लक्षात घेऊन तिची कलोपासना जोपासण्यासाठी गीत लेखन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तनिष्काने गायलेले पहिले सपनो की उडान हे प्रेरणादायी हिंदी गीत आणि आताचे नवे रंग हे मराठी निसर्ग गीत या दोन्ही गीतांची रचना श्री.श्यामकांत रुले यांनीच केली आहे. मुलगी एक यशस्वी गायिका व्हावी अशी मनिषा त्यांनी व्यक्त केली. एका सर्वसामान्य कुटुंबातील असामान्य आवाज,मंत्रमुग्ध करणारे हे गीत आहे.

संगीत क्षेत्रातील दिग्गजांचे मोलाचे सहकार्य-
नवे रंग या गीताला संगीत क्षेत्रातील सुप्रसिद्ध बासरी वादक वरद काठापुरकर यांच्या जादुई बासरीचे सूर व तबला वादक रसिक कुलकर्णी यांची तबल्याची साथ लाभली असून सुप्रसिद्ध संगीतकार एम.डी.सौरभ यांचे संगीत लाभले आहे. गाण्याचे रेकॉर्डिंग,मिक्सिंग आणि मास्टरिंग शुभम जोशी यांचे तर व्हिडिओ शुटींग पियूष भानोसे यांनी केले आहे. संपूर्ण गाण्याचे रेकॉर्डिंग हे नाशिक येथील फेदर टच स्टुडिओ आणि मुंबई येथील हार्मनी स्टुडीओ येथे झाले आहे.
गायिका तनिष्काचे या संगीतमय प्रवासाच्या अप्रतिम यशाबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे…




