मुंबई – मध्य रेल्वेवरील ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम २०२४ विविध उपक्रम आणि कार्यक्रमांसह २ ऑक्टोबर २०२४ रोजी संपन्न झाले.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री धरम वीर मीना यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या उपनगरीय ट्रेन्सच्या समोरील मोकळ्या जागेत रामधूनच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान श्री लाल बहादूर शास्त्री यांना आदरांजली वाहिली.

उपनगरातील लॉबीसमोर काढलेल्या महात्मा गांधींच्या भव्य रांगोळीचेही त्यांनी कौतुक केले.
महाव्यवस्थापकांनी प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ वरील दोन इएमयू रेकची पाहणी केली. सदर रेकच्या आतील आणि बाहेरील भागावर महात्मा गांधी आणि स्वच्छता घोषवाक्यांसह विशेष सुशोभित केलेल्या इएमयू रेकला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. त्यांनी मध्य रेल्वे सांस्कृतिक अकादमीने आयोजित केलेला आणि माटुंगा आणि परळ वर्कशॉपच्या कलाकारांनी संयुक्तपणे सादर केलेला नुक्कड नाटक “कम ऑन इंडिया” पाहिला.

मीना यांनी नंतर पर्यावरण आणि गृहव्यवस्थापन विभागातर्फे आयोजित “वेस्ट टू आर्ट” या थीमवरील प्रदर्शनाला भेट दिली ज्यामध्ये स्टेशन क्लीनिंग मशीन, उच्च दाबाचे थंड पाणी जेट मशीन, वॉटर प्युरिफायर (विजेशिवाय चालणारे), स्क्रॅप मटेरियलपासून बनवलेले स्टीम इंजिन मॉडेल आणि टाकून दिलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनवलेल्या फुलांच्या कुंड्या प्रदर्शित करण्यात आल्या होत्या.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेन लाईन प्लॅटफॉर्मवर जाताना, महाव्यवस्थापकांनी खास महात्मा गांधींच्या फोटोने आणि त्यांच्या स्वच्छतेच्या संदेशाने सजवलेल्या डिझेल लोकोमोटिव्हची पाहणी केली. कार्यक्रमाचा समारोप करताना, श्री मीना यांनी स्वच्छता रॅलीला हिरवा झेंडा दाखवला, ज्यात हाऊसकीपिंग कर्मचारी, स्काउट्स आणि गाईड्स आणि नागरी संरक्षण दलातील स्वयंसेवकांचा समावेश होता. यामधून स्वच्छता तसेच स्वच्छ भारत मिशनची बांधिलकी बळकट झाली.

प्रभात रंजन, अपर महाव्यवस्थापक; सुनील कुमार, प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता; एस एस गुप्ता, प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक; रजनीश माथूर, प्रधान मुख्य अभियंता; सहर्ष वाजपेयी, प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी; अवनीश कुमार पांडे, मुख्य प्रशासकीय अधिकारी (निर्माण); रजनीश गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग; इतर विभाग प्रमुख आणि मुख्यालय आणि मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मध्य रेल्वेच्या पुणे, नागपूर, सोलापूर आणि भुसावळ विभागातही असेच उपक्रम राबविण्यात आले.
सोलापूर विभागात मोठ्या प्रमाणात श्रमदान करण्यात आले, ज्यामध्ये २०० हून अधिक लोकांनी सहभाग घेतला. विविध कार्यक्रमांसोबतच स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी नुक्कड नाटकही सादर करण्यात आले.
पुणे विभागामध्ये पुणे, पिंपरी, आकुर्डी, चिंचवड, सातारा, मिरज, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी लोकसहभागातून विविध युनिट्समध्ये सामूहिक श्रमदान, ट्रॅक क्लीनिंग कार्यक्रम इ.चे आयोजन करण्यात आले होते. स्टेशन सफाई कर्मचारी, तंत्रज्ञांसह परवानाधारक कुली इ. प्लेकार्ड आणि बॅनर धरून ठिकठिकाणी स्वच्छता रॅली काढण्यात आल्या होत्या.
नागपूर विभागात एक सामूहिक साफसफाईचा प्रयत्न राबविण्यात आला, ज्यात संत निरंकारी मंडळ, नागपूर शाखेसह रेल्वे कर्मचारी आणि खाजगी संस्थांचे प्रतिनिधी ५५० हून अधिक जण सहभागी होते. याशिवाय ठिकठिकाणी श्रमदान व स्वच्छता रॅलीही काढण्यात आल्या.
भुसावळ विभागात ठिकठिकाणी श्रमदान व इतर स्वच्छता उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यासोबतच स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी स्वच्छता प्रभात रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते.
स्वच्छता ही सेवा मोहीम स्वच्छतेच्या आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनावर भर देते. स्वच्छ भारत मिशनच्या १०व्या वर्धापन दिनानिमित्त या वर्षीची मोहीम विशेष महत्त्वाची आहे, जी देशभरातील स्वच्छता आणि स्वच्छता सुधारण्यासाठी सुरू असलेल्या वचनबद्धतेला अधोरेखित करते.


