डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रेमी होते -डॉ .प्रदीप तायडे : जयंतीनिमित्त ऑनलाईन एक दिवशीय कार्यशाळा


भुसावळ -,श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालय, भुसावळ व सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय एनपुर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम श्री संत गाडगेबाबा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश जोशी यांच्या शुभहस्ते डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.प्राचार्य व सर्व प्राध्यापकांनी अभिवादन केले. कार्यशाळेत अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. रमेश जोशी यांनी भूषवले तसेच कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे ऐनपूर कॉलेजचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने हे होते. कार्यशाळेत प्रमुख वक्ता म्हणून डॉ. प्रदीप नामदेव तायडे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर समाज सुधारक , प्रकांड पंडित, उच्च विद्या विभूषित, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. त्यांनी समाज बांधवांसाठी अहोरात्र परिश्रम केले. डॉ .बाबासाहेबांनी आपल्या भाषणातून जनतेला शिका, संघटित व्हा ,संघर्ष करा, असे सांगत स्वावलंबनाचे धडे दिले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब हे थोर विचारवंत होते. स्त्रियांच्या हक्कासाठी त्यांनी खूप मोलाचे कार्य केले. 32 पदव्या त्यांनी मिळवल्या. तसेच याप्रसंगी प्राचार्य डॉ. रमेश जोशी यांनी अध्यक्षीय भाषणातून आपले विचार व्यक्त करताना सांगितले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातल्या लोकांसाठी महान कार्य केले. बौद्ध धर्मातील लोक त्यांना बोधिसत्व मानतात. देशभरात त्यांचे लाखो अनुयायी आहेत .”मरावे परी कीर्ती रुपी उरावे “असे त्यांचे जीवन होते. असे सांगितले .बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात निबंध स्पर्धा ही आयोजित करण्यात आली होती. त्यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग घेतला. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. विनोद रामटेके व आभार डॉ. विवेक जोशी यांनी मानले. कार्यशाळेत दोन्ही महाविद्यालयाचे समस्त प्राध्यापक ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते .अशा या महामानवाला सर्वांनी विनम्र अभिवादन करून आदरांजली वाहिली.