व्युत्पत्ती कोशामुळे शब्दसंपत्तीत भर – डॉ. जगदीश पाटील : ई-बालभारती व्हर्च्युअल क्लासेसमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

भुसावळ – एखाद्या शब्दाच्या किंवा अर्थाच्या मुळाचे ज्ञान सांगणे, त्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे व्युत्पत्ती त्पत्ती होय. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तीचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश होय. या व्युत्पत्ती कोशामुळे शब्दांचे मूळ रूप दिसून अर्थातील बदल व फरक दिसून येतो. तसेच त्या बदलाचे कारण देखील स्पष्ट होत असते. व्युत्पत्ती कोशामुळे शब्दसंपत्तीत भर पडत असते, असे प्रतिपादन बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले.

पुणे येथील ई-बालभारतीच्या स्टुडिओमध्ये व्हर्च्युअल क्लासेसअंतर्गत ऑनलाईन अध्यापन करताना दहावीच्या विद्यार्थ्यांशी डॉ. जगदीश पाटील यांनी संवाद साधला. व्हर्च्युअल क्लासेसच्या माध्यमातून आतापर्यंत दहावीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ्यघटकांचे ऑनलाईन अध्यापन करण्यात येत आहे. समारोपाच्या ऑनलाईन अध्यापन वर्गात बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी मराठी भाषा विषयाच्या कुमारभारती पाठ्यपुस्तकातील स्थूलवाचनात असलेला व्युत्पत्ती कोश या पाठाचे अध्यापन केले. यात त्यांनी कोश म्हणजे काय, व्युत्पत्ती कोश कसा हाताळावा याविषयीची माहिती दिली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या शब्दसंपत्तीत भर होऊन शब्दनिर्मितीची प्रक्रिया कशी असते हे जाणून घेण्यासाठी व्युत्पत्ती कोश महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येत्या काही दिवसात दहावीच्या बोर्ड परीक्षा होत असून त्या परीक्षेच्या बाबतीत कोणत्याच प्रकारची भीती विद्यार्थ्यांनी आपल्या मनात बाळगू नये. सकारात्मक रीतीने परीक्षेला सामोरे जावे. परीक्षेपर्यंत जेवढे दिवस आपल्या हातात आहे तेवढ्या दिवसाचे विषयनिहाय नियोजन करून अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. यादरम्यान जास्तीत जास्त घटक पाठ्यघटक समजून घ्यावेत. जेणेकरून एकदा पाठ्यघटक लक्षात आला की, कृती अथवा प्रश्न सोडवणे सोपे जाते. त्यामुळे ताणतणाव न बाळगता परीक्षेस सामोरे जायला हवे, असेही डॉ. पाटील आपल्या अध्यापनादरम्यान केले. सदरचे ऑनलाईन अध्यापन हे ई-बालभारती स्टुडिओ तीन या यूट्यूब चैनलवर उपलब्ध आहे. ज्यांना ऑनलाईन अध्यापनात सहभागी होता आले नाही, त्यांनी सदर यूट्यूब चैनलवर असलेल्या व्हर्च्युअल क्लासेसचा लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. जगदीश पाटील यांनी केले.