मुख्य अभियंता यांनी बॉक्सिंग प्रशिक्षक सागर निकम यांना दिला प्रमुख पाहुण्यांचा सन्मान : शाळेचे संचालक डॉ.विजय खाचणे यांना विशेष सन्मानपत्र देऊन केले सन्मानित

भुसावळ – विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर आपल्यातील वकृत्व, क्रिडा अश्या विविध कलागुणांही प्राधान्य द्यावे, असे मार्गदर्शन दिपनगर येथील श्री शारदा माध्यमिक, तांत्रिक व कनिष्ठ महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना केले, तर बॉक्सिंग प्रशिक्षक सागर निकम यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना स्वतः प्रमुख पाहुणेच्या जागी बसवून विशेष सन्मान दिला. या सन्मानाला उत्तर देतांना सागर निकम यांचे मन भारावून गेले. प्रसंगी महाविद्यालयाच्या सुशोभीकरणासाठी दिपनगर प्रशासन प्रयत्नशील राहिल, असे मुख्य अभियंता यांनी आश्वासन दिले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.एस. कवठे, प्रमुख पाहुणे चेअरमन उन्मेश पाटील, उपमुख्य अभियंता सोनकुचुरे , डी.आर.ओ. मुकेश मेश्राम, मानद चिटणीस मिलिंद गाजरे, उपाध्यक्ष राकेश राणे, खजिनदार तेजस चौधरी, चेअरमन प्राथमिक भूषण पाटील, संचालक आर.एन.गाजरे, विश्वनाथ राणे, अरुण पाटील, रमेश गाजरे, प्रसन्नकुमार पाटील, डॉ.विजय खाचणे, मुख्याध्यापक अजय झोपे, प्राथमिकचे मुख्यध्यापक ढाके सर, आयटीआय विभागाचे मुख्यध्यापक बेंडाळे सर, पर्वेक्षक जे.बी.पाटील, संजय भटकर, पत्रकार राजेश निकम, बॉक्सिंग प्रशिक्षक सागर निकम हे मान्यवर मंचावर उपस्थित होते.
प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. स्वागतगीत व शांतीगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्याचा सत्कार करण्यात आला. शाळेचे संचालक डॉ.विजय खाचणे यांचा विशेष सत्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात आला.
प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत जे.बी.पाटिल यांनी महाविद्यालयाचा ४१ वर्षाचा गौरवशाली इतिहास सांगत २०२२-२३ या वर्षातील दहावीचा निकाल ९५.४५ टक्के तर बारावीचा निकाल ९३.५० टक्के असा लागला असून राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत गणेश कोळी यास सुवर्ण पदक तर कार्तिक काचेवार, मंगेश जाधव यांनी कांस्यपदक मिळवून शाळेचे नावलौकिक केले आहे. यांना बॉक्सिंग प्रशिक्षक सागर निकम यांचे मार्गदर्शन मिळत आहे. या गुणवंतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रसंगी संजय भटकर यांनी महाविद्यालयाच्या सुशोभीकरणासाठी मदत करावी अशी मुख्य अभियंता यांना विनंती केली.
यावेळी दहावी, बारावी प्रथम, द्वितीय तसेच ५ वी ते १२ वी मधील इतिहास, भूगोल, गणित, इंग्रजी व मराठी या विषयात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना रोख रक्कम तर “रंगशारदा २०२३-२४” या स्नेहसंमेलनातील गीत गायन, वकृत्व स्पर्धा, आनंद मेळावा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, समूह नृत्य अशा विविध स्पर्धेतील ९० विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. प्रसंगी शिक्षक नितेश भालेराव व शिक्षिका रेखा खारे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा परिचय उपस्थितांना दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक निलेश नेहते, टी.पी.राणे, महेंद्र सपकाळे, गणेश सरोदे, पवार सर, गणेश तायडे, पी.टी.सोनवणे, आशिष गुरचळ, शिक्षिका सरोदे मॅडम, इंगळे मॅडम, मनिषा मॅडम, सर्व शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन जयश्री येवले यांनी केले. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थीनी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



