रोटरी क्लब ऑफ भुसावळ मध्ये जागतिक आदिवासी दिवस संपन्न !


भुसावळ – येथील रोटरी क्लब मध्ये आज आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.
या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाचे भौतिक शास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ दयाघन एस राणे हे प्रमुख व्याख्याते म्हणून तर रोटरी क्लब ऑफ भुसावळ चे अध्यक्ष रो. विकास कात्यायनी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून. उपस्थित होते.
आपल्या व्याख्यानात प्रा डॉ दयाघन राणे यांनी जागतिक स्तरावरून आदिवासी दिवस साजरा करण्यामागील पार्श्वभूमी सांगितली. त्या वेळी आपल्या देशाची घटना लिहिली जात असताना घटनाकार म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्या नंतर आदिवासी विकासाला प्राधान्य देत असताना लिहिलेल्या अनुच्छेदांची माहिती स्पष्ट करून भारतातील आदिवासी विकास आणि जागतिक स्तरावरील आदिवासी विकास या बद्दलची तुलनात्मक माहिती दिली. तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यापीठ स्तरीय आदिवासी विद्यार्थी आत्मविश्वास आणि प्रेरणा विकास कार्यक्रमांमध्ये सहभागी असतानाचे त्यांचे अनुभव ही स्पष्ट केलेत.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना रो. विकास कात्यायनी यांनी ” आपण आदिवासी दिवस साजरा करतो म्हणजे आपण आदिवासी समुदायाचे संघर्ष समजून घेतो, त्यांना सामाजिक , आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या पाठिंबा देण्याचे संकेत देतो. आणि आदिवासी जण जातींच्या विकासाचे चिंतन करतो असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लबच्या कार्यक्रम समिती च्या माध्यमातून करण्यात आले होते. या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ भुसावळ चे माजी अध्यक्ष रो हेमंत नाईक यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब चे सचिव रो संजय चापोरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब ऑफ भुसावळ चे सर्व संचालक, सदस्य आणि अनेक नागरिक उपस्थित होते.