भुसावळातील नगरसेवकांचे अपात्रता प्रकरण : 23 रोजी होणार सुनावणी –

भुसावळ : भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा न देताच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या शहरातील तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्षांसह अन्य नऊ नगरसेवकांना जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरवले होते. या निर्णयाविरोधात अपात्र नगरसेवकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून या याचिकेवर आता 23 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.

नगरविकास विभागाकडेही मिळाला नाही दिलासा
लोकनियुक्त नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवकांनी भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा न देताच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता मात्र या संदर्भात भाजपाने स्थानिक नगरसेविका पुष्पा बतरा यांच्या माध्यमातून संबंधिताना अपात्र करण्याची याचिका दाखल केली व जिल्हाधिकार्‍यांनी उभयंताना एका टर्मसाठी अपात्र केले होते. यानंतर या निर्णयाविरोधात नगरविकास विभागाकडे दाद मागण्यात आली मात्र तेथेही दिलासा मिळाला नसल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर मंगळवार, 17 रोजी सुनावणी होती मात्र आता सुनावणी सोमवार, 23 जानेवारी रोजी होणार आहे. अपात्र नगरसेवकांकडून अ‍ॅड.आर.आर.देशमुख तर भाजप नगरसेविका पुष्पाबाई रमेशलाल बतरा यांच्या वतीने अ‍ॅड.होन कामकाज पाहत आहेत.