जळगाव – विद्यार्थ्यांच्या अभ्यासात भर पडावी या उद्देशाने ऐतिहासिक व धार्मिक स्थळांची माहिती घेण्यासाठी जळगाव तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात काढण्यात आली.

ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना भेट दिल्याने इतिहास माहिती होऊन त्यातून प्रेरणा मिळते. पाठ्यपुस्तकात वाचलेले स्थळ समोर पाहताना विद्यार्थ्यांची उत्सुकता कमालीची जागी होवून त्यांना अतिरिक्त ज्ञान मिळते. यासाठीच जळगाव तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेची शैक्षणिक सहल संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात नुकतीच काढण्यात आली. श्रीभद्रा मारोती मंदिर, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर, मालोजीराजे व शहाजीराजे स्मृतिस्मारक, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंड, वेरूळ लेणी व कैलास मंदिर, देवगिरी (दौलताबाद) किल्ला, सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय, बीबी का मकबरा आदी स्थळांना भेट देऊन माहिती जाणून घेतली. मुख्याध्यापक संतोष वानखेडे, सविता निंभोरे, ज्योती वाघ, डॉ. जगदीश पाटील, गणेश तांबे या सर्व शिक्षकांनी सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्येक स्थळाची माहिती दिली.
स्थळांना भेटी व माहिती – श्री भद्रा मारोती मंदिर हे हनुमानाचे प्राचीन मंदिर असून येथील मूर्ती शयनावस्थेत आहे. श्री घृष्णेश्वर मंदिर हे एक भगवान शंकराचे प्राचीन मंदिर असून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. घृष्णेश्वर येथून जवळच मालोजीराजे व शहाजीराजे यांचा पूर्णाकृती पुतळा असलेले स्मारक आहे. प्राचीन, ऐतिहासिक व धार्मिक स्थळ असलेले श्रीक्षेत्र वेरूळ येथील अहिल्याबाई होळकरांच्या स्मृती जपणारे शिवालय तीर्थकुंड आहे. कळसापासून पायापर्यंत कोरीव काम तयार करून तयार करण्यात आलेली वेरूळ लेणी आणि द्रविडी शैलीचे कैलासनाथ मंदिर आहे. उत्कृष्ट वास्तूकलेने बांधण्यात आलेला मध्ययुगीन काळातील सर्वात शक्तिशाली किल्ल्यांपैकी एक असलेला यादवकालीन ऐतिहासिक देवगिरी (दौलताबाद) किल्ला आहे. संभाजीनगर (औरंगाबाद) येथील सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय मराठवाड्यातील एकमेव प्राणी संग्रहालय असून यात सुमारे दोनशेपेक्षा जास्त प्राणी व पक्षी आहेत. तेथील विविध प्राणी व पक्षी पाहून विद्यार्थ्यांनी त्यांची माहिती जाणून घेतली. बीबी का मकबरा यास सन्मानाने मराठवाड्याचा ताजमहाल म्हणतात. अशा विविध स्थळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांनी त्यांची माहिती एकदिवसीय शैक्षणिक सहलीद्वारे जाणून घेतली.


