भुसावळ (प्रतिनिधी) : विधी सेवा समिती, भुसावळ यांच्या वतीने कायद्याचा प्रचार व प्रसार तसेच विधी सेवा समितीच्या विविध उपक्रमांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने दि. १ व २ नोव्हेंबर २०२६ रोजी दोन दिवसीय जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकल लेवा महिला मंडळ, भुसावळ यांच्या वतीने प्रभाकर हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘महिला उद्योग भरारी’ प्रदर्शनात या जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विधी सेवा समितीच्या PLV स्वाती भोळे व PLV रूपाली नेवे यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सकल लेवा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. मंगला पाटील, उपाध्यक्षा सौ. प्रभाताई पाटील, उपसचिव सौ. कावेरी चौधरी तसेच कार्यकारिणी सदस्य सौ. मनीषा पाटील, वैशाली चौधरी, सौ. वैशाली धांडे, सौ. मेघा कुरकुरे, सौ. संध्या भोळे, सौ. वैशाली दिनेश पाटील, सौ. मृणाल पाटील व सौ. मोना भंगाळे यांनी सहकार्य केले. या दोन दिवसीय महिला उद्योग भरारी प्रदर्शनाला साधारणतः ८०० ते १००० महिलांनी भेट दिली. यावेळी PLV रूपाली नेवे व PLV स्वाती भोळे यांनी उपस्थित महिलांना विधी सेवा समितीची कार्यपद्धती, कायदेविषयक मदत व उपलब्ध विधी सेवा याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच कायदेविषयक जनजागृती करणाऱ्या माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले. महिलांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, त्यांना त्यांच्या हक्कांची व उपलब्ध कायदेशीर मदतीची माहिती मिळावी, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला महिलांचा चांगला प्रतिसाद लाभला.


