भुसावळ : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील समता नगरात रेल्वेच्या रीकाम्या निवासस्थानात अवैधरित्या गावठी दारू, पन्नीतील दारूची विक्री होत असल्याने तेथे दररोज सायंकाळी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक येत असल्याने त्यास रहिवासी वैतागले होते. यामुळे पोलिस आणि रेल्वे प्रशासनाने संयुक्त मोहिम राबवित शुक्रवारी सकाळी रीकाम्या निवासस्थानावर बुलडोझर चालवित गुन्हेगारांचा अड्डा बनसलेले दोन रिकामी निवासस्थाने अवघ्या पाच तासातच जमीनदोस्त केले.

रहिवासी झाले होते त्रस्त
शहरातील समता नगरात समता नगराचा फलक लावलेल्या इलेक्ट्रीकच्या खांब्याजवळ रेल्वेची रीकामे निवासस्थाने होती. या निवासस्थानावर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार रात्री उशीरापर्यत थांबून राहत असल्याने परीसरातील रहिवासी त्रस्त झाले होते.
पोलिस, रेल्वे प्रशासनाची बैठक
समता नगरातील रीकाम्या निवासस्थानात गुन्हेगार गोळा होत असून सामाजिक शांततेला यापासून बाधा निर्माण होत असल्याने हा गुन्हेगारांचा अड्डाच नेस्तनाबूत करण्यासाठी पोलिस प्रशासनाने रेल्वे प्रशासनासोबत डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी गुरूवारी चर्चा केली. रीकामे निवासस्थाने पाडून टाकावे, यावर चर्चा होऊन त्यांची तात्काळ शुक्रवारी अंमलबजावणी करण्यात आली.
पाच तासात तोडली निवासस्थाने
समता नगरात रेल्वेचेी दोन रीकामी निवासस्थाने होते, त्यात दारूचा अड्डा सुरू असल्याने शुक्रवारी याच दोन्ही निवासस्थानांवर रेल्वेतर्फे हातोडा पडला. पोलिस निरीक्षक गजानन पडघन यांच्यासह 10 पोलिस कर्मचारी अतिक्रमण काढण्याच्या ठिकाणी बंदोबस्तास होते. पोलिस बंदोबस्त असल्याने तेथे कोणीही गुन्हेगार फिरकला नाही. सकाळी 10 वाजता सुरू झालेली ही मोहिम दुपारी दोनपर्यत सुरू होती. यात 10 मजुरांनी दोन्ही घरे जमीनदोस्त केले.
दिनदयाल नगरात होणार कारवाई
शहरातील ज्या घरांमधून अवैध प्रकार चालत असतील, तेथे पोलिस व पालिकेच्या माध्यमातून धडक घरे जमीनदोस्त करण्याची प्रक्रीया राबविली जाणार आहे. शहरातील दिनदयाल नगरातील काही चार ते पाच घरांमध्ये सुध्दा अवैध धंदे चालतात, ते घरे सुध्दा पोलिस प्रशासनाच्या रडारवर आहे, लवकरच तेथील ही घरे जमीनदोस्त केली जाणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले.


