भुसावळ : शहरातील अवघ्या 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीशी 60 वर्षीय वृद्धाने विवाह केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून या प्रकारातून तरुणी सहा महिन्यांची गर्भवती राहिली आहे. अत्याचार केल्याप्रकरणी पतीविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. अमजद इब्राहिम कुरेशी (60, भुसावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे.
शहरातील एका भागातील रहिवासी असलेल्या 17 वर्षीय तरुणीशी संशयीत अमजद कुरेशी याने फेब्रुवारी 2012 रोजी विवाह केला व त्यानंतर शारीरीक संबंध ठेवल्यानंतर पीडीता सहा महिन्यांची गर्भवती राहिली होती. याबाबत जळगावच्या बालकल्याण समितीकडे तक्रार करण्यात आली होती. या मुलीस बालकल्याण समितीने ताब्यात घेऊन जबाब घेतला. त्यानुसार बाजारपेठ पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यासाठी करण्यासाठी कागदपत्र वर्ग करण्यात आले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात बलात्कार, पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय हरीश भोये, योगेश महाजन हे करीत आहेत. दरम्यान, पिडीतेला सासरच्या लोकांनी शारीरीक त्रास देत मानसिक छळ केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.



