भुसावळात कोळी समाजाचा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमांवर कठोर शिक्षेची मागणी :

भुसावळ : यावल तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी प्रांताधिकारी कार्यालयावर कोळी समाज बांधवांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.
यावल तालुक्यातील एका गावातील एका अल्पवयीन मुलीवर 26 जानेवारी रोजी तीन नराधमांनी अत्याचार केला होता. या तिन्ही नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे, या मागणीसाठी शुक्रवारी कोळी समाज बांधवांच्या वतीने भुसावळ शहरातील प्रभात हॉल ते प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. याप्रकरणी प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांना निवेदन देण्यात आले.
मोर्चात नारायण कोळी, रावेरचे गंभीर उन्हाळे, वरणगावचे पप्पू कोळी, फेकरीचे आकाश सपकाळे, बंडू कोळी, दीपनगरचे गजू तायडे, जाडगावचे गणेश सोनवणे, हतनूरच्या सुनंदा तायडे, सीमा तायडे, वंदना कोळी, तळवेलच्या मनीषा कोळी, गोंभी येथील लता सपकाळे, वैशाली कोळी, चंदन तायडे, विकी कोळी, भागवत कोळी, स्वप्नील कोळी, निलेश कोळी, आकाश कोळी यांच्यासह मोठ्या संख्येने कोळी समाजबांधव सहभागी झाले.