नाशिक : दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात शिवशाही बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने शिवशाही बस उड्डाण पुलाखालील पिलरला जाऊन धडकली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर बसमधील चार प्रवासी जखमी झाले आहेत. नाशिक शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावर तपोवन चौफुलीवर शनिवारी सकाळी हा अपघात झाला. जखमींमध्ये भास्कर साहेबराव ठाकूर (49, रा. दीपालीनगर, नाशिक), ज्योत्स्ना श्रीनिवास सूर्यवंशी (45, रा. एन.डी. पटेलरोड, नाशिक) व इतर दोघांचा समावेश आहे.

बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी नाशिकहून औरंगाबादकडे शिवशाही बस (Shivshahi Bus) जात होती. त्याचवेळी मुंबई-आग्रा महामार्गावरील तपोवन चौकात (उड्डाणपुलाखाली समोरून भरधाव वेगात दुचाकीस्वार येत होता. या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ही बस उड्डाण पुलाखालील 14 नंबरच्या खांब्यावर जाऊन धडकली. अचानक झालेल्या या अपघातामुळे (Accident) बसमधील प्रवासी एकमेकांवर जाऊन आदळले. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला तर जखमींना जवळच्या खाजगी व जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृत दुचाकीस्वाराबाबत माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे.



