भुसावळ (प्रतिनिधी )-
पाऊस कधी सुरू होईल, तो कोठे आणि किती होईल याची माहिती प्रशासनाला मिळाल्यास आपत्कालीन अलर्ट देऊन जीवित आणि वित्तहानी टाळणे खात्रीने शक्य होईल. यासाठी डॉप्लर रडारची उभारणी फारच महत्त्वपूर्ण मानण्यात येते. केंद्र शासनाकडून पाच एक्स बॅंड डॉप्लर रडार महाराष्ट्रात बसवण्यात येणार आहेत. त्यातील एक रडार जळगाव जिल्ह्यासाठी मंजूर करावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संबंधीतांकडे पत्रव्यवहार केला असल्याची माहिती शिवसेना तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी दिली.
“एक्स बॅंड डॉप्लर’ ही विज्ञानाची अशी एक निर्मिती आहे, ज्याने काही तास अगोदरच आपल्याला ढगफुटी, गारपीट आदींची अचूक माहिती मिळते. उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून उंचीवरील ठिकाणी बसविणे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य असल्याचे हवामान तज्ञांचे म्हणणे आहे. ही डॉप्लर रडार बसविल्यास उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्याला याचा लाभ होणार आहे. यामुळे हवामानाची अचूक माहिती शेतकऱ्यांना मिळणार असून आपत्ती व्यवस्थापनासाठीदेखील ते उपयुक्त ठरणार आहे.
यंत्रणेमुळे शेतकऱ्यांना फायदा
हवामानाचे, पावसाचे, अतिवृष्टीचे, गारपिटीचे अचूक अंदाज वर्तविण्यासाठी डॉप्लर रडार ही यंत्रणा उपयुक्त असते. या यंत्रणेच्या साहाय्याने आपत्कालीन स्थितीचा अचूक अंदाज आधीच घेता येतो. त्यामुळे नुकसानाची तीव्रता कमीत कमी करण्यासाठी आधीच प्रयत्न करता येतात. विज्ञानाने विकसित केलेली ही फार मोठी देण असून जगभर तिचा उपयोग केला जातो. बोटाच्या पेराएवढ्या लहान भागातदेखील किती बाष्प, बर्फ कण व पाणी आहे याची माहिती ही यंत्रणा देते. त्यामुळे किती मिलीमीटर पाऊस, कोणत्या ठिकाणी व किती वाजता पडेल हे बिनचूक सांगणे शक्य आहे. जळगांव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अचूक हवामान माहिती मिळाल्यास फायदा होणार असल्याने पाठपुरावा करीत आहे, असे प्रा.पाटील यांनी सांगितले. जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे यांनाही निवेदनाच्या प्रत पाठवण्यात आले आहे.
# तांत्रिक माहिती :
डॉप्लर रडार ही पावसाची खात्रीशीर माहिती देणारी आपत्कालीन यंत्रणा आहे. अचूक हवामान माहिती देण्यासाठी तिचा वापर जगभर सर्रासपणे केला जातो. डॉप्लर रडार विद्युत चुंबकीय लहरी ढगावर सोडते. ढगांकडून परतणाऱ्या लहरी ढगाची ‘एक्स रे’प्रमाणे इत्थंभूत माहिती आणतात. डॉप्लर रडार ढग सरकत असतानाही अचूक माहिती देते. डॉप्लर रडारच्या साहाय्याने पावसाची, ढगफुटीची, गारपिटीची माहिती सहा ते चार तास आधी मिळू शकते. २५० किलोमीटरपर्यंतच्या परीघात पाऊस, गारपीट किंवा ढगफुटी कोठे कोठे होणार, हे किमान एकतास आधी १०० टक्के खात्रीपूर्वच अचूक सांगता येते.
समुद्रकिनाऱ्यांवर, तसेच पर्वतीय परिसरातील संभाव्य पाऊस, चक्री वादळे, हिमवृष्टी, उष्म्याची लाट, हवामानातील अचानक बदल, ढगफुटीमुळे अतिवृष्टी, बर्फवृष्टी, धुलीकणांचे वादळ किंवा इतर वादळे होणार असतील, तर त्याचा अंदाज खूप आधीच येऊ शकतो. त्या शहर, गाव, खेड्यातील हवामान खाते आपत्ती व्यवस्थापनास याची पूर्व कल्पना देऊन, संबंधित शहर अथवा गाव-खेड्यात येणाऱ्या प्रलयंकारी पाऊस, वादळ, पुरापासून मनुष्य आणि वित्त हानी टाळू शकते किंवा आधीच उपाय योजना केल्याने नुकसानाचे प्रमाण कमीत कमी करता येऊ शकते.
डॉप्लर रडार पावसाचे अचूक व खात्रीशीर पूर्वानुमान जाणून घेण्याचे उत्तम तंत्र समजले जाते. विद्युतचुंबकीय लहरींचा, मोकळ्या आकाशातील हवेच्या बदलांची अचूक माहिती (१ ते २ गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सी), जवळच्या व दूरच्या ढगांच्या अचूक माहिती (२ ते ४ गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सी), परदेशात खासगी टीव्ही वाहिन्या अति जवळच्या ढगांच्या अचूक माहितीसाठी (४ ते ८ गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सी), हवेतल्या बाष्प, बर्फ कण तसेच पाण्याच्या थेंबांच्या आकार व प्रकार अचूक, तसेच ढगफुटींची माहिती (८ ते १२ गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सी), ढग तयार होण्यासारखी परीस्थिती आहे का, बनलेला ढग गडद होईल की विखरून जाईल, वारे किती उंचीवर कसे वाहतात हे ८ ते १२ गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सीवर कळते. ढगातील एकूण बर्फ कण, पाणी आणि गारांच्या निर्मितीचा वेग व त्यावरून त्या किती नुकसान करू शकतात, याची अगदी प्रत्येक सेंटिमीटरच्या भागातली शंभर टक्के (१२ ते १८ गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सी) अचूक माहिती मिळते. हवेतील बाष्पाचे प्रमाण मोजण्यास १८ ते २४ गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सीचा वापर केला जातो.



