गौताळा –
गौताळा औट्राम घाट वन्यजीव अभ्यारण्यात अवैध उत्खनन करून मौल्यवान खडक व वन उपज चोरल्याप्रकरणी चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गौताळा औट्रामघाट अभयारण्यास लागून असलेल्या मौजे. गराडा , ता. कन्नड जि. औरंगाबाद येथील आरोपी , काले खॉ सरदार खाँ , शरीफ सरदार खाँ पठाण , कालू खाँ पठाण ,महेबुब खाँ पठाण यांनी गौताळा औट्राम घाट वन्यजीव अभ्यारण्यात अवैध उत्खनन करून मौल्यवान खडक व वन उपज चोरल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली. या संशयित आरोपींच्या घरी 23 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास धाडीची कारवाई वन्यजीव व प्रादेशिक विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी पार पाडली.
सदर धाडीच्या कारवाईमध्ये आरोपींच्या घरामध्ये Natrolite, Apophyllite, Chabazite प्रकारातील मौल्यवान खडक, सफेद मुसळी व डिंक असा वनांतील वनउपज जप्त करण्यात आला. सदर मुद्देमालाचे वजन केले असता, मौल्यवान दगड 301 किग्रॅ. सफेद मुसळी 5.15 किग्रॅ. व धामोडी डिंक 6.84 किग्रॅ.असा मुददेमाल व टिकाव, कुदळ, छन्या, टॉमी , करवत इत्यादी साहित्य धाडीच्या कार्यवाहीमध्ये जप्त करण्यात आले आहे. सदर आरोपी अभ्यारण्यात फरार असल्याच्या माहिती वरून रात्री उशिरा पर्यंत अभ्यारण्यात संयुक्त शोध मोहीम राबविण्यात आली. या वन गुन्ह्यातील आरोपी अद्यापी मिळून आलेले नाहीत. कन्नड तालुक्यातील गराडा गाव हे अनेक अवैध व्यावसायासाठी कुविख्यात आहे.
वरील कारवाई औरंगाबाद वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी, विजय सातपूते यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. कारवाई मध्ये डॉ. राजेंद्र नाळे, सहाय्यक वनसंरक्षक पैठण, कन्नड वन्यजीव परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. शेळके, सागर ढोले, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) नगद , फिरते पथक औरंगाबाद चे वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद गायके हे सहभागी होते. तसेच अभयारण्य क्षेत्रात आरोपींच्या शोध मोहिमेमध्ये शोधमोहिमेत नंदुरबार चे सहायक वन संरक्षक, धनंजय पवार , जळगाव जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, जामनेर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील यांनी सहकार्य केले. सदर कारवाईत वनपाल संदीप मोरे, विजय ढिघोळे , मनोज उधार, पोपट बर्डे,काटकर, देशमुख, रायसिंग , दारुंटे व वनरक्षक वन मजूर ,पोलीस पाटील व कर्मचारीयांचे सह औरंगाबाद व धुळे वनवृत्ततील अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग होता. अभ्यारण्यात अवैध उत्खनन व तस्करी प्रकरणी वन्यजीव विभागाकडून वरील नमुद फरार आरोपी विरोधात वनगुन्हा नोंद केला असून , गुन्ह्याचा तपास वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) श्री. आर. बी. शेळके हे करीत आहेत.
वन्यप्राणी किंवा इतर मौल्यवान वनउपजा संदर्भात कुठलाही वनगुन्हा निदर्शनास आल्यास तात्काळ नागरिकांनी वनविभागाच्या टोल फ्री नंबर 1926 वर संपर्क साधव असे आवाहन वन्यजीव विभाग औरंगाबादकडून करण्यात आले आहे .



