प्रवासा दरम्यान महिलांच्या सुरक्षेकरीता मध्य रेल्वेतर्फे “मेरी सहेली” उपक्रमास प्रारंभ ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
प्रवासा दरम्यान महिला प्रवाशांना सुरक्षितता आणि सुरक्षा पुरविण्यासाठी मध्य रेल्वेने “मेरी सहेली” कार्यक्रमाची सुरूवात केली
महिलांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास देण्यासाठी मध्य रेल्वेने सातत्याने प्रयत्न करून “मेरी सहेली” कार्यक्रम सुरू केला आहे. महिला प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान सुरक्षा पुरविण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) मध्य रेल्वेने सुरू केलेले हे एक विशेष कार्य / कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरू करण्यात आला आहे.

नावाप्रमाणेच “मेरी सहेली” ही महिला प्रवाशांची सतत सोबती / मित्र म्हणून काम करेल जी त्यांची सुरक्षा केवळ सुरुवातीच्या स्थानकांतच नव्हे तर मार्गावरील स्थानकांवर, ट्रेनमध्ये आणि गंतव्य स्थानकांवर देखील करेल. या कारवाईअंतर्गत महिला अधिकारी आणि कर्मचार्‍यांची एक विशेष टीम तयार केली गेली आहे जी महिला प्रवाशांसह सर्व प्रवासी डब्ब्यांना भेट देईल आणि ट्रेनमध्ये प्रवास करणार्‍या महिला प्रवाशांची ओळख पटवेल. महिला प्रवाशांशी संवाद साधताना हे पथक आरपीएफ सुरक्षा हेल्पलाईन क्रमांक १८२, जीआरपी हेल्पलाईन क्रमांक १५१२ आणि इतर सुरक्षिततेसाठी घ्यावयाची काळजी अद्ययावत करेल. तसेच अपरिचित लोकांकडून खाण्यायोग्य वस्तू स्वीकारू नयेत, फक्त अधिकृत आयआरसीटीसी स्टॉल्समधूनच अन्न खरेदी करण्याबाबत घ्यावयाची खबरदारी व सल्ले देईल.

नाव, पीएनआर / तिकिट क्रमांक, कोच आणि बर्थ क्रमांक इत्यादी प्रवाशांचा तपशील देखील “मेरी सहेली” टीम नोंदवेल. हे तपशील मूळ स्थानक ते गंतव्य स्थानकापर्यंत मार्गावरील इतर क्षेत्रांत / विभागांमध्ये सामायिक केले जातील. थांबलेल्या स्थानकांवर तैनात केलेली “मेरी सहेली” टीम महिला प्रवाशांची सुरक्षा आणि आरोग्याबद्दल विचारपूस करेल. अधिक चांगली सेवा देण्यासाठी पावले उचलण्यासाठी प्रवासाचा अनुभव अभिप्राय गंतव्यस्थानावर घेतला जाईल.

मध्य रेल्वेच्या आरपीएफने २४ विशेष गाड्यांमध्ये “मेरी सहेली” कार्यक्रम सुरू केला असून यास मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यात मुंबई-नागपूर-मुंबई दुरंतो एक्सप्रेस, गोदान एक्सप्रेस, गोंदिया-मुंबई विशेष , मुंबई-हावडा एक्सप्रेस, पुणे-पाटणा विशेष अशा इतर गाड्यांचा समावेश आहे.

महिलांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास करण्यामध्ये मध्य रेल्वे नेहमीच अग्रणी राहिली आहे. महिला प्रवाशांची संरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या समर्पित प्रयत्नांचा ‘मेरी सहेली’ आणखी एक महत्त्वाचा भाग असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *