इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील सक्षम महिला अभियंत्यांची मोठी मागणी: प्रा.स्मिता चौधरी


भुसावळ,(प्रतिनिधी )-
देशात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची मागणी वाढल्याने या क्षेत्रात निर्मितीसाठी शक्यता वाढल्या आहेत. साधारणत: सर्व क्षेत्रांत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची मागणी होत असते, तंत्रज्ञानाच्या या मागणीला तोंड देण्यासाठी आगामी काळात इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील सक्षम महिला अभियंत्यांची मोठी मागणी असणार आहे. ह्या महिला अभियंता स्पर्धेत पुढे राहण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान तयार करण्यात आणि टिकवून ठेवण्यात सहभागी होतील. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करणाऱ्यांना यात उत्तम शक्यता-संधी आहेत असे प्रतिपादन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम असोसिएशनच्या सदस्या प्रा.स्मिता चौधरी यांनी केले. भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स शाखेत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, डीन डॉ.राहुल बारजिभे, विभाग प्रमुख डॉ.गिरीष कुलकर्णी यांनी विद्यार्थीनींना याक्षेत्राशी संबंधीत भविष्यातील तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेबद्दल मार्गदर्शन केले.
२०२२ पर्यंत ८९ लाख इलेक्ट्रॉनिक्स अभियंत्यांची गरज: प्रा.सुलभा शिंदे
नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अनुसार इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात २०२२ च्या शेवटपर्यंत ८९ लाख इलेक्ट्रॉनिक्स स्किल्ड वर्करची गरज असेल. एका अहवालानुसार देशातील इलेक्ट्रॉनिक्स मार्केट ४१.४ टक्के वार्षिक दराने वाढत आहे आणि २०२२ च्या शेवटपर्यंत याची ४०० अब्ज डॉलर होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात टेलिव्हिजन, संगणक, टेलिकम्युनिकेशन व इतर उत्पादनाची निर्मिती केली जाते. महिला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरचे काम इलेक्ट्रॉनिशी संबंधित समस्यांवर उत्तम मार्ग काढणे आणि असे उत्पादन बनविणे, जे सध्याच्या परिस्थितीत महिला अभियंत्यांना सहज सोपे असेल म्हणून येणाऱ्या प्रत्येक संधीचा फायदा करून घ्या असे आवाहन प्रा.सुलभा शिंदे यांनी केले.
खाजगी क्षेत्रासह सरकारी कंपनीत नोकरीच्या संधी : डॉ.नीता नेमाडे
खाजगी क्षेत्रासोबतच इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करणारे विद्यार्थी केंद्र सरकार, राज्य सरकारद्वारा संचालित सार्वजनिक उद्योग, खासगी संघटना – जसे की ऑल इंडिया रेडिओ, इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज, एमटीएनएल, नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीज, एअर सिव्हिल एव्हिएशन विभाग, पोस्ट अँड टेलिग्राफ डिपार्टमेंट, को-ऑर्डिनेशन डिपार्टमेंट, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि विविध राज्यांच्या डेव्हलपमेंट सेंटरमध्ये नोकरी करू शकतात. याशिवाय देश आणि विदेशांतील इंजिनिअरिंग कॉलेजमध्येदेखील शिक्षकाच्या रूपात नोकरी करू शकतात अशी माहिती डॉ. नीता नेमाडे यांनी दिली.
अनुभवानंतर एक चांगले पॅकेज : श्वेता सिंह
या क्षेत्रात फ्रेशरला १५ ते २० हजार रुपये पेक्षा जास्त प्रतिमहाचे पॅकेज मिळू शकते. काही‌ वर्षांच्या अनुभवानंतर हे पॅकेज ४ ते ५ लाख रुपये वार्षिकपर्यंत असू शकते असे मत टेक महिंद्रामध्ये काम करणाऱ्या माजी विद्यार्थिनी श्वेता सिंह हिने व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *