भुसावळ (प्रतिनिधी )-
एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून तीन जणांवर चाकू हल्ला झाल्याची घटना शहरातील खडका रोडवरील मुस्लीम कॉलनीमध्ये शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले असलेतरी अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मुस्लीम कॉलनी भागात शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास खुन्नस देतो, असे म्हणत संशयितांनी चाकू हल्ला केला. यात जुम्मन खान सिराजउल्ला खान (47), इन्सानअली मोहम्मद मजीद (27) आणि अब्दुल हक सिराजउल्लाखान (32) हे जखमी झाले. त्यांच्या हातावर, खांद्यावर चाकूने वार केल्याच्या जखमा आहेत. बाजारपेठ पोलिसांनी संबंधीताना उपचारार्थ हलवण्यासंदर्भात मेमो दिला असून त्यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी पोलिसांना रवाना केले. पोलिस कर्मचारी रमण सुरळकर, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, विकास सातदिवे, उमाकांत पाटील, सचिन चौधरी, चेतन ढाकणे या पोलिसांनी तीन संशयीतांना चौकशीकामी ताब्यात घेतले.



