सुनसगाव- वार्ताहर :-
भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे येथिल श्रीकपिलेश्वर महादेव मंदिर हे हेमाडपंथी असून भगवान श्री शंकराच्या आरतीमध्ये सुद्धा वेल्हाळा चा उल्लेख आहे . ‘भोळा शंकर शोभे उमा वेल्हाळा’ .
अतिशय प्राचीन अश्या या मंदिरात श्रावण मासानिमित्त भाविकांची गर्दी होत असते यंदा मात्र कोरोना मुळे भाविक बाहेरुनच दर्शन घेत आहे.
या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये असून श्रावण महिन्यात दर सोमवारी या मंदिराची विशेष बाब पाहण्यास मिळते परंतु अलीकडे पुरातत्व खात्याचेही दुर्लक्ष झाल्याने मंदिराची दुरावस्था होतांना दिसत आहे.
मंदीराची रचना हेमाडपंथी – वेल्हाळे येथील श्री कपिलेश्वर महादेव मंदिराची बांधणी हेमाडपंथी आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी कोठेही सिमेंेंट, चूना, रेतीचा वापर केलेला आढळत नाही फक्त कोरीव काम केलेले शिल्प कोरलेले दगड एकमेकांवर विशिष्ट पद्धतीने ठेवण्यात आलेले असून हेमाडपंथी बांधणीचा उत्कृष्ट नमुना या ठिकाणी पाहण्यास मिळतो.
श्री यंत्रावर बसलेली पिंड- देशात बाराज्योतिर्लिंग महत्त्वाचे मानले जातात परंतु या पैकी एकाही ठिकाणी श्री यंत्रावर पिंड नाही फक्त महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी श्री यंत्रावर विराजमान आहे आणि दुसरे म्हणजे वेल्हाळे येथील श्री कपिलेश्वर महादेव मंदिर येथील पिंड श्री यंत्रावर विराजमान आहे. यामुळे देशातील एकमेव असे हे मंदीर आहे.
श्रावणी सोमवारची वैशिष्ट्ये – श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी मंदीराची वैशिष्ट्ये पाहण्यास मिळतात ऐरवी फिक्कट दिसणारे मंदीराचे शिल्प (दगड) पहिल्या श्रावणी सोमवार पासून काळेभोर दिसून चमकू लागतात तसेच पुर्ण श्रावण महिनाभर मंदीराचा रंग खुललेला असतो त्यामुळे मंदीरावरील शिल्पकला चित्रकला अतिशय मनमोहक दिसते आणि श्रावण महिना संपला की पुन्हा मंदीराचे दगड फिक्कट दिसू लागतात.
पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष- हे मंदीर पुरातत्व विभागाकडे आहे या मंदीराची ट्रस्ट स्थापन असून अनेक वर्षांपासून हभप महंत पंढरीनाथ स्वामी महाराज हे काम पाहत असल्याचे समजते. या मंदिराकडे पुरातत्व खात्याचे अधिकारी पाहिजे तसे लक्ष देत नाहीत. त्यामुळे मंदीराची दुरावस्था होतांना दिसत आहे.या मंदीराला लागून अनेक मंदिरे असून गावात ठिकठिकाणी मुर्त्या विखुरलेल्या अवस्थेत दिसतात. त्यामुळे पुरातत्व खात्याने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
उमाळा (ता. जळगाव) अणि वेल्हाळे गावांना विशेष स्थान – श्री भगवान शंकराच्या आरतीमध्ये उल्लेख आहे की ‘ऐसा भोळा शंकर शोभे उमा वेल्हाळा’ उमा म्हणजे उमाळा महेश्वर मंदीर असलेले उमाळा (ता.जळगाव) व वेल्हाळा म्हणजे श्री कपिलेश्वर महादेव मंदिर असलेले वेल्हाळे (ता भुसावळ) हे गाव विशेष म्हणजे उमाळा व वेल्हाळा येथील मंदीरे सारखीच आहेत.
वेल्हाळे ग्रामस्थांसाठी ऐतिहासिक ठेवा – श्री कपिलेश्वर महादेव मंदिर वेल्हाळे ग्रामस्थांसाठी ऐतिहासिक ठेवा आहे आणि हे मंदीराची काळजी घेणे वेल्हाळे येथील प्रत्येक ग्रामस्थाचे कर्तव्य आहे जर ग्रामस्थांनी विशेष काळजी घेतली आणि शासनाकडे पाठपुरावा केला तर हेच मंदीर मोठे तिर्थक्षेत्र होऊ शकते असे सांगितले जात आहे.



