पगार उशिराने होत असल्याने शिक्षकांमध्ये संताप ; शिक्षणाधिकारीसह वेतन अधीक्षक व शिक्षणसभापती यांना निवेदन ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
प्रत्येक महिन्याला पगार उशिरा होत असल्याने जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शिक्षकांमधून संतापाची भावना व्यक्त होत आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे पगार शासन निर्णयानुसार एक तारखेलाच व्हावे व गेल्या तीन ते चार महिन्यांपासून २० टक्के अनुदानित शाळेतील शिक्षकांचा रखडलेला पगार नियमित सुरू व्हावा, डीसीपीएस स्लीप वेतन पथकाकडूनच दिली जावी, अशा विविध मागण्यांसंदर्भात खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघ भुसावळ तालुका कार्यकारणीच्या वतीने शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक व शिक्षण सभापती यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा पगार दर महिन्याला तब्बल २० ते २५ दिवस उशिराने होत असल्याची माहिती संघटनेचे पदाधिकारी यांनी उपशिक्षणाधिकारी राजेंद्र सपकाळे, वेतन अधीक्षक शर्मा व शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांना दिली. दिवाळीदेखील जवळ आलेली आहे त्यामुळे पुढील पगार हा वेळेत होईल का? असा प्रश्न शिक्षकांकडून विचारला जात आहे. २० टक्के अनुदानीत शाळेतील शिक्षकांचे पगार गेल्या तीन ते चार महिन्यांपासून रखडले असल्यामुळे सदर शिक्षकांमधून प्रचंड आक्रोश व्यक्त होत आहे. पगार वेळेवर होत नसल्याने शिक्षकांची आर्थिक कोंडी होत आहे. बँकाचे कर्जाचे हप्ते वेळेत भरले जात नसल्याने अतिरिक्त व्याज भरावे लागत असल्याचे संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी खा.प्रा. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे भुसावळ व जळगाव येथील पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *