छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकानंतर चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी मध्य रेल्वेच्या आपटा स्थानकाला चित्रपट निर्मात्यांची सर्वाधिक पसंती ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वेच्या आपटा स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकानंतर   चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी
मध्य रेल्वेच्या पनवेल -रोहा मार्गावरील आपटा स्थानकाला
चित्रपट निर्मात्यांची सर्वाधिक पसंती दर्शवली आहे .
 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकानंतर मध्य रेल्वेवरील आपटा रेल्वे स्थानक, चित्रपट निर्मात्यांसाठी सर्वात लोकप्रिय चित्रिकरण स्थळ ठरले आहे.  २०१९-२०२० या आर्थिक वर्षात आपटा रेल्वे स्थानकावर रात अकेली है, मुंबई ,सागा आणि शुभ मंगल झायदा सावधान यासह चार चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले होते तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ८ चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले होते, त्यामध्ये लोकप्रिय चित्रपट पंगा, चोक्ड आणि सूरज से मंगल भारी इ. चित्रपटांचा समावेश आहे.
दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है, रंग दे बसंती, बागी, खाकी, शादी नंबर १, चाइनाटाऊन आणि बॉक्स ऑफिसवरच्या अनेक लोकप्रिय चित्रपटांसह आपटा स्टेशन असंख्य चित्रपटांमध्ये कॅमेर्‍याबद्ध झाला आहे.  मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री शिवाजी सुतार म्हणाले, “आपटा निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळखला जातो ज्याच्या एका बाजूला टेकडी आहे, दुस-या बाजूला नदीजवळील रस्ता आणि पोहोचण्यास  सुलभ रस्ता आहे, वळणदार ट्रॅक आणि प्लॅटफॉर्मसह पनवेल -रोहा मार्गावर हे स्थानक आहे.   कलाकारांची  व्हॅनिटी व्हॅन्स  पार्क करुन ठेवण्यासाठी पुरेशी जागा येथे आहे.  कमी गर्दी असलेले असे स्थानक चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी योग्य स्थान आहे.”  आपटा रेल्वे स्थानकावर  काही गाड्यांना थांबा देण्यात आला आहे आणि ते क्रॉसिंग स्टेशन असल्याकारणाने आणखी एक ज्यादा  ट्रॅक असून चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बुक केलेल्या विशेष गाड्यांच्या हालचालींसाठी जास्त सोयीची  आहे.  आपटा हे स्थानक फिल्म सिटी, मुंबईपासून सुमारे ७५ कि.मी. अंतरावर असून प्रवास फक्त २ तासांचा आहे.  त्यामुळे  वेब मालिका, माहितीपट आणि टीव्ही मालिकांच्या  चित्रीकरणासाठी आपटा रेल्वे स्थानक सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनले आहे.
चित्रपट निर्मात्यांच्या  आवश्यकता पूर्ण करणार्‍या अनेक सुंदर चित्रीकरण स्थळे / स्थानके मध्य रेल्वेला लाभली  आहेत.  चित्रीकरणासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  स्थानकापासून ते  आपटा, पनवेल, चौक, लोणावळा, खंडाळा, वाठार, सातारा आणि तुर्भे आणि वाडी बंदर सारख्या  रेल्वे स्थानकांपर्यंत  सर्वात जास्त पसंतीची चित्रपटाच्या चित्रीकरणाची स्थळे आहेत.  
चित्रपटाच्या चित्रीकरणाची परवानगी मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात येते, अलीकडेच चित्रपटाच्या चित्रीकरणाची परवानगी वेगवान करण्यासाठी सिंगल विंडो सिस्टम सुरू केली आहे. या प्रक्रियेच्या सुलभतेमुळे चित्रपट  तयार करणा-या कंपन्यांना स्क्रिप्ट आणि आवश्यक असलेल्या बाबीं नमूद करून व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यानंतर परवानगी मिळू शकेल.  
चित्रपटाच्या चित्रीकरणातून रेल्वेला १.३३ कोटीचे उत्पन्न ;
मध्य रेल्वेने  वर्ष  २०१९-२० मध्ये २१ चित्रपटाच्या चित्रीकरणातून रू. १.३३ कोटी उत्पन्न मिळविले आहे.   छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक येथे  ‘पंगा’ चित्रपटासह ८ चित्रपटांच्या चित्रीकरणातून रु. ४४.५२ लाख, आपटा स्थानकात ४ चित्रपटांच्या  चित्रीकरणातून २२.६१ लाख रूपये उत्पन्न  मिळविले तर   पनवेल स्थानकात चित्रीकरण करण्यात आलेल्या रजनीकांत अभिनित चित्रपट  ‘दरबार’ कडून सर्वाधिक रु. २२.१० लाख उत्पन्न  मिळविले.  पुणे विभागातील निसर्गरम्य वाठार स्थानकात सलमान अभिनित  ‘दबंग 3’ च्या  रू. १५.६२ लाख चित्रीकरण शुल्कासह  ३ चित्रपटांमधून रू. ३७.२२ लाख रुपये उत्पन्न प्राप्त झाले.  पुणे ते मुंबई दरम्यान ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटाचे चित्रीकरण, तुर्भे आणि वाडी बंदर यार्ड, पुणे स्टेशन यासारख्या चित्रपटाच्या चित्रीकरण  पासून चांगले उत्पन्न मिळाले.
कोविड १९ चा प्रसार रोखण्यासाठी एकूणच हालचालींवर मर्यादा असल्या तरी मध्य रेल्वेला आशा आहे की, आपटा व इतर अशा ठिकाणांचे सौंदर्य नजीकच्या भविष्यात पुन्हा उजळू शकेल.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *