भुसावळ उपविभागात पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ विशेष मोहीम; अवैध धंद्यांवर धडक कारवाई!

अवैध दारू विक्रीचे ८ गुन्हे, जुगाराचे ६ गुन्हे दाखल; ५ हद्दपार आरोपींवर कारवाई, ५ चोरीचे मोबाईल हस्तगत

भुसावळ ( प्रतिनिधी )- 

भुसावळ पोलीस उपविभागाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत भुसावळ बाजारपेठ, भुसावळ शहर, नशिराबाद आणि भुसावळ तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी विविध ठिकाणी धडक कारवाई केली. अवैध दारू विक्री, जुगार अड्डे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन तसेच सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

अवैध दारू विक्रीवर कारवाई; १५८ लिटर गावठी दारू जप्त

दारूबंदी कायद्यांतर्गत अवैध गावठी हातभट्टी दारू विक्रीप्रकरणी सहा गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत १५८ लिटर गावठी दारू आणि ७० लिटर रसायन जप्त करण्यात आले. तसेच देशी व विदेशी दारूच्या अवैध विक्रीप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले. या एकूण आठ गुन्ह्यांमध्ये आठ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून जप्त मुद्देमालाची किंमत २४ हजार ८०० रुपये आहे.

जुगार अड्ड्यांवर छापे; सहा गुन्हे दाखल

जुगारविरोधी कारवाईत महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) अन्वये सहा गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत आठ आरोपींवर कारवाई करून रोख रकमेसह एकूण पाच हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तलवार जप्त; हद्दपार आरोपींवरही कारवाई

शस्त्र अधिनियमांतर्गत एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्याकडून ५०० रुपये किमतीची तलवार जप्त करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये पाच गुन्हे दाखल करून पाच हद्दपार आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली. तसेच प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत कलम १२२ अन्वये तीन गुन्हे दाखल करण्यात आले.

१३ वॉरंट आणि १० समन्स बजावले

न्यायालयीन कामकाजाच्या अनुषंगाने पोलिसांनी विशेष मोहीम राबवून अजामीनपात्र व जामीनपात्र असे एकूण १३ वॉरंट बजावले. तसेच न्यायालयाकडून जारी करण्यात आलेले १० समन्स संबंधितांना बजावण्यात आले.

वाहतूक नियमभंग करणाऱ्यांना दणका; ८३ हजार ५०० रुपयांचा दंड

वाहतूक शाखा आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्धही कारवाई करण्यात आली. ड्रंक अँड ड्राइव्हच्या तीन, हेल्मेट न वापरण्याच्या ११ आणि अनधिकृत पार्किंगच्या १३ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. याशिवाय मोटार वाहन कायद्यांतर्गत इतर ५९ कारवाया करण्यात आल्या. या मोहिमेदरम्यान एकूण ८३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सराईत गुन्हेगारांची तपासणी; ३७ आरोपी ताब्यात

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी ७३ सराईत गुन्हेगारांची तपासणी केली. अभिलेखावरील ३७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तसेच शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या १५ मद्यपी व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात आली. याशिवाय उपविभागातील २२ हॉटेल व लॉज तसेच १९ भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली.

पानटपऱ्यांवर कोटपा कायद्यान्वये कारवाई; पाच मोबाईल हस्तगत

तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीसंदर्भात कोटपा कायद्यांतर्गत पानटपऱ्यांवर २३ केसेस दाखल करून तीन हजार ६० रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच CEIR पोर्टलच्या माध्यमातून पाच मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. या मोबाईलची अंदाजित किंमत ६० हजार रुपये आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची कठोर भूमिका

भुसावळ पोलीस उपविभागाच्या या ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहिमेमुळे अवैध धंदे, जुगार, दारू विक्री, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध व्यापक कारवाई करण्यात आली. सराईत गुन्हेगारांची तपासणी, हद्दपार आरोपींवर कारवाई, न्यायालयीन वॉरंटची बजावणी आणि विविध आस्थापनांची तपासणी अशा बहुआयामी उपाययोजनांमुळे पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने ठोस पाऊल उचलले आहे. ही कारवाई यापुढे देखील अशीच सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.