भुसावळ,( प्रतिनिधी दि. १६ नोव्हेंबर) : महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवून त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भुसावळ नगरपालिका व आस बहुउद्देशीय विकास संस्था, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत शहरातील महिलांसाठी मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गरुड प्लॉट येथे हा प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी सौ. रजनीताई सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी महिलांनी केवळ घरापुरते मर्यादित न राहता स्वतःच्या कौशल्याचा विकास करावा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी अशा प्रशिक्षण उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. ब्युटी पार्लर प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना व्यवसायाचे कौशल्य आत्मसात करून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळू शकते, असेही त्यांनी नमूद केले. महिला व बालकल्याण सभापती सौ. शोभाताई रणधीर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच आस बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष महेंद्रदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सौ. मीनाताई लोणारी, सौ. अर्चना सातदिवे, सौ. सीमाताई नरवाडे, सौ. सोनल महाजन, सौ. सविता मकासारे, सौ. दीपाली बऱ्हाटे, सौ. वैशाली शेतवाल, सौ. वैशाली मराठे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रशिक्षण कार्यक्रमात शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना ब्युटी पार्लर व्यवसायासंबंधी मूलभूत ज्ञान व कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे. या कौशल्याच्या बळावर महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करून कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात हातभार लावू शकतील. त्यामुळे महिलांच्या आत्मविश्वासात वाढ होण्यासह महिला सक्षमीकरणालाही निश्चितच चालना मिळणार आहे. महिलांना केवळ प्रशिक्षण न देता त्यांना स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम ठरत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आस बहुउद्देशीय विकास संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.



