कु-हे (पानाचे) येथे बलिप्रतिपदेला १८ कष्टकरी शेतकऱ्यांचा सन्मान ‘पाणी आमच्या हक्काचे’, ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला; पारंपरिक तळी उचलण्याचा कार्यक्रम उत्साहात


भुसावळ - प्रतिनिधी

बलिप्रतिपदेच्या मंगल पर्वाचे औचित्य साधून कुहे (पानाचे) येथे शेतकरी पाणी हक्क समितीच्या वतीने पारंपरिक तळी उचलण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित या कार्यक्रमात गावातील १८ कष्टकरी शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शेतीसाठी हक्काचे सिंचनाचे पाणी मिळावे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी एकजुटीने लढा उभारावा, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

‘इडा-पिडा टळो, बळीचे राज्य येवो’, ‘पाणी आमच्या हक्काचे’ आणि ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करत शेतकऱ्यांच्या श्रमाचा सन्मान आणि त्यांच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आणण्याचे काम या सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आप्पासाहेब एकनाथराव बडगुजर होते. प्रमुख पाहुणे म्हणून जी. के. दादा पाटील, नथ्यू वराडे दादा, रविंद्र गांधेले, निवृत्ती बावस्कर आणि मधुकर सपकाळे उपस्थित होते.

**१८ कष्टकरी शेतकऱ्यांचा गौरव**

कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलेल्या सन्मान सोहळ्यात गावातील १८ कष्टकरी शेतकऱ्यांना रुमाल, टोपी आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. काळ्या आईची सेवा करून समाजाची अन्नाची गरज भागविणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला भावला.

यामध्ये प्रभाकर कुंभार, सुरेश तेली, दिनकर सुतार, नामदेव वराडे, मुरलीधर भाई, प्रीतम पारधे, समाधान आठवले, रमेश बावस्कर, अशोक काळे, मोहन ताडे, गोकुळ कोळी, हिरा परदेशी, राजू बडगुजर, मानसिंग जाधव, यासीन मन्यार, अमोल बिल, दिनेश गांधेले आणि संतोष पारधी या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

**पारंपरिक तळी उचलून कार्यक्रमाचा शुभारंभ**

कार्यक्रमाची सुरुवात काशिनाथ पाटील, जगण पाटील, संजय वराडे, संदीप महाजन, प्रकाश चौधरी, छगन वराडे, गोकुळ कोळी, प्रकाश उंबरकर आणि विलास चौधरी यांच्या हस्ते पारंपरिक तळी उचलून करण्यात आली. यावेळी सुधाकर बडगुजर यांनी तळी उचलण्याच्या परंपरेचे महत्त्व विशद करत शेती आणि पाणी यांचे अतूट नाते अधोरेखित केले.

**शेतीसाठी हक्काचे पाणी मिळणे आवश्यक**

प्रास्ताविकात विकास चौधरी यांनी बलिप्रतिपदेचे महत्त्व सांगत शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधले. शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे आणि शेतीच्या प्रश्नांवर समाजाने एकजुटीने उभे राहिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कुहे (पानाचे) परिसरातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतीला वेळेवर आणि पुरेसे पाणी उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होऊ शकते. त्यामुळे पारंपरिक तळी उचलण्याचा हा कार्यक्रम केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेपुरता मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या पाणी हक्काच्या लढ्याला बळ देणारा ठरला.

राजा बळी यांच्या समता, समृद्धी आणि लोककल्याणाच्या विचारांचे स्मरण करून शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. शेतकऱ्यांच्या घामाला प्रतिष्ठा, शेतीला हक्काचे पाणी आणि कष्टकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय खऱ्या अर्थाने बळीराजाचे राज्य साकार होणार नाही, असा ठाम संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

**ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती**

या कार्यक्रमाला रविंद्र बोबडे, मधुकर पाटील, प्रवीण नागपुरे, शशिकांत वराडे, आण्णा गुरुजी, चंद्रकांत बावस्कर, विलास रंदाळे, एन. डी. पाटील, रमेश जाधव, कसदास जाधव, श्रीकांत बरकले, संजू शिंदे, गोपाल अस्वार, श्रीदत्त गुरु भजनी मंडळ, विनोद कोळी, राकेश बारी, एकनाथ पाटील, रमेश कोळी आणि बापू पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद उंबरकर यांनी केले, तर अरविंद बावस्कर यांनी आभार मानले.