भुसावळ (प्रतिनिधी)-इस्कॉन भुसावळ येथील श्री श्री राधा मुरलीधर मंदिरात १४ नोव्हेंबर रोजी बालदिन आणि गोपाष्टमी या दोन्ही मंगलमय पर्वांचा संयुक्त उत्सव अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे गोपाल फन स्कूल आणि चेतना गर्ल्सच्या माध्यमातून मुलांसाठी आयोजित करण्यात आलेले विविध सांस्कृतिक खेळ, मनोरंजक उपक्रम आणि श्रीकृष्णांच्या बाललीलांवर आधारित आनंददायी कार्यक्रम सादर करण्यात आले. भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत ज्या प्रकारे खेळत, बागडत आणि आनंद लुटत असत, त्याच बालसुलभ आनंदाची अनुभूती मुलांना या उत्सवातून देण्यात आली. आजच्या सोशल मीडिया आणि मोबाईलच्या युगात मुलांना केवळ शैक्षणिक ज्ञान देणे पुरेसे नाही, तर त्यांचा मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकास होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मुलांना आनंदी बालपण, उत्तम मित्रपरिवार, भारतीय संस्कृतीची ओळख, उच्च जीवनमूल्ये आणि सुंदर संस्कार मिळावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. “मुलांना केवळ आज आनंदी ठेवणे नव्हे, तर त्यांच्या जीवनात उत्तम संस्कारांची बीजे पेरून त्यांचे भविष्य उज्ज्वल करणे हेच आमचे ध्येय आहे.” याच उद्देशाने इस्कॉन भुसावळ येथे दर रविवारी सायंकाळी ५ वाजता ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी गोपाल फन स्कूल व चेतना गर्ल्सचे पूर्णतः निःशुल्क उपक्रम आयोजित केले जातात. यामध्ये मुलांना भारतीय संस्कृती, सण-उत्सवांचे महत्त्व, आध्यात्मिक मूल्ये, संस्कार आणि आनंददायी सामूहिक उपक्रमांची ओळख करून दिली जाते. पालकांनी आपल्या मुलांना या उपक्रमात सहभागी करून त्यांच्या आनंदी, संस्कारमय आणि उज्ज्वल भविष्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन इस्कॉन भुसावळच्या वतीने करण्यात आले. स्थळ : श्री श्री राधा मुरलीधर मंदिर, इस्कॉन भुसावळ वेळ : प्रत्येक रविवार, सायंकाळी ५ वाजता वयोगट : ५ ते १५ वर्षे प्रवेश : पूर्णतः निःशुल्क



