जळगाव (प्रतिनिधी) : क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त तसेच जनजातीय गौरव दिनानिमित्त जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी उपस्थित राहून भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच खासदार स्मिता वाघ, अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, यावल आदिवासी विकास विभागाचे अरुण पवार आणि जळगावच्या तहसीलदार शीतल राजपूत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. आदिवासी महिला बचत गटांचा गौरव .. .कार्यक्रमादरम्यान उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदिवासी महिला बचत गटांना प्रोत्साहनपर प्रशस्तिपत्रे आणि धनादेशांचे वितरण करण्यात आले. या माध्यमातून आदिवासी महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासोबतच त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिला बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळत असून, अशा उपक्रमांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होत आहे. भगवान बिरसा मुंडा यांचे कार्य सदैव प्रेरणादायी भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्या शौर्य, संघर्ष आणि अदम्य राष्ट्रप्रेमाच्या बळावर जनजातीय समाजाच्या स्वाभिमानासाठी, हक्कांसाठी आणि न्यायासाठी लढा दिला. ब्रिटिश सत्तेविरुद्ध त्यांनी केलेला संघर्ष भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण अध्याय मानला जातो. त्यांचे विचार, त्याग आणि समाजहितासाठी केलेले कार्य आजही संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा जनजातीय गौरव दिन हा आदिवासी समाजाच्या संस्कृती, परंपरा, अस्मिता आणि योगदानाचा गौरव करणारा दिवस म्हणून मानला जातो.



