तापी नदीच्या तीरावर छटपूजा महोत्सवाला भाविकांची मांदियाळी!

महिलांनी नदीपात्रात उतरून केली विधिवत पूजा; उत्तर भारतीय बांधवांनी जपली धार्मिक परंपरा

भुसावळ प्रतिनिधी : छटपूजा महोत्सवानिमित्त भुसावळ शहरातील उत्तर भारतीय समाजाच्या वतीने फिल्टर हाऊस परिसरातील तापी नदीच्या तीरावर भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला सायंकाळी सुमारे पाच ते सहा हजार भाविकांनी उपस्थिती लावत मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने छटमातेचे पूजन केले. हजारो भाविकांच्या उपस्थितीमुळे तापी नदीचा परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.

छटपूजेच्या निमित्ताने महिला भाविकांनी तापी नदीच्या पात्रात उतरून पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजा-अर्चा केली. सूर्यदेव आणि छठी मातेची आराधना करत महिलांनी धार्मिक विधी पूर्ण केले. कुटुंबीयांसह आलेल्या भाविकांमध्ये उत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.

भुसावळ छटपूजा समितीच्या वतीने नदीकाठावर आकर्षक मंडप उभारण्यात आला होता. तसेच परिसरात विद्युत रोषणाई व आकर्षक सजावट करण्यात आली होती. पूजेसाठी आवश्यक साहित्य आणि भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. उत्सवात सहभागी होणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजन केले होते. यावेळी समितीचे अध्यक्ष विक्रांतसिंह राजपूत यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या धार्मिक सोहळ्यात रेल्वे विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच आयुध निर्माणी भुसावळ येथील अधिकारी आणि कर्मचारी आपल्या कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उत्तर भारतीय समाजातील नागरिकांनी आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन करत छटपूजा उत्साहात साजरी केली.

यावेळी भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, नगरसेवक युवराज लोणारी, राजेंद्र आवटे, परिक्षित बऱ्हाटे, किरण कोलते, भाजपचे शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, पुरुषोत्तम नारखेडे यांच्यासह रेल्वेतील विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पूजेच्या साहित्याची विल्हेवाट आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
छटपूजेचे विधी पूर्ण झाल्यानंतर पूजेसाठी वापरण्यात आलेले साहित्य भाविक आपल्या घरी घेऊन गेले. दरम्यान, तापी नदीच्या पात्रात उतरून पूजा करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित नसल्याचे दिसून आले. यासंदर्भात समितीच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे आवश्यक मनुष्यबळाची मागणी करण्यात आली होती का, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. हजारो भाविकांची उपस्थिती आणि नदीपात्रात होणारी गर्दी लक्षात घेता अशा धार्मिक कार्यक्रमांमध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची उपस्थिती असणे आवश्यक असल्याचा मुद्दा यानिमित्ताने चर्चेत आला आहे.

एकंदरीत, तापी नदीच्या तीरावर पार पडलेल्या या भव्य छटपूजा महोत्सवातून भुसावळमधील सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचे दर्शन घडले. श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात उत्तर भारतीय बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपली परंपरा जपली.