भुसावळ (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार 'ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी उपाययोजना' या उपक्रमांतर्गत स्थानिक नाहाटा महाविद्यालयातील माता पालक समितीच्या वतीने आजी-आजोबा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी एका विशेष बैठकीचे व मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता पालक समिती प्रमुख प्रा. कीर्ती नागदेव यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात या उपक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांनी भूषविले. तर मुख्य पाहुणे म्हणून कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद (ता. यावल, जि. जळगाव) येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. जतीन श्रीधर मेढे उपस्थित होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. वाय. एम. पाटील आणि पर्यवेक्षक प्रा. स्वाती पाटील यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. सर्व पाहुण्यांच्या स्वागतानंतर उपस्थितांमध्ये एक महत्त्वपूर्ण जागृती निर्माण करण्यासाठी, 'ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिष्ठेचा आदर करण्याबाबतची शपथ' सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मिळून सामूहिकपणे घेतली. यानंतर कार्यक्रमात उपस्थित सर्व आजी-आजोबांचा पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सन्मान करण्यात आला व त्यांच्याप्रती ऋणनिर्देशन करण्यात आले. घरातील ज्येष्ठ नागरिक हीच आपली खरी शिदोरी: प्रा. डॉ. जतीन मेढे मुख्य पाहुणे प्रा. डॉ. जतीन मेढे यांनी आपल्या ओघवत्या आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. ते म्हणाले की, "तुमचे आजी-आजोबा हे तुमच्या भविष्याचे प्रतिबिंब आहेत. जपान सर्व बाबतीत प्रगत देश असून तेथील लोक १०० ते १२५ वर्षांपर्यंत सहज जगतात, कारण त्यांच्या समाजव्यवस्थेत अजूनही वृद्धाश्रम ही संकल्पना नाही. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेले 'कार्यमग्न हे जीवन व्हावे' हेच तत्व जपानी लोक 'इकिगायी' (Ikigai) नावाने अवलंबितात." पुढे बोलताना त्यांनी खंत व्यक्त केली की, "विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे आपले जीवनमान बदलले, पण माणुसकी कमी होत चालली आहे. साक्षरतेत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असला तरी हे शिक्षण आपल्या घरात दिसत नाही. म्हणूनच बहिणाबाई चौधरी यांना 'अरे मानसा मानसा कवा होशील तू माणूस' असे विचारावे लागले. आधी एक तीळ सात जणांनी वाटून खाण्याचे संस्कार होते, आज आपण स्वार्थी झालो आहोत. मागील अशिक्षित पिढीने पुढच्या पिढीला डॉक्टर-इंजिनिअर केले, मात्र आजच्या शिकलेल्या पिढीने मुलांना केवळ संस्कारहीन शिक्षण दिले. छत्रपती संभाजीराजांना त्यांच्या आजी राजमाता जिजाऊंनी घडवले म्हणून ते महान झाले." त्यांनी कोल्हापूरचे व नंदुरबारचे माजी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांचे प्रेरणादायी उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना आपले आई-वडील आणि आजी-आजोबा यांना दैवत मानण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, "त्यांची काळजी घ्या, त्यांना जपा, कारण तीच तुमची शिदोरी असून आपल्या संस्कृती व संस्कारांचे खरे वाहक आहेत." आजी-आजोबांचे संस्कार चांगली व्यक्ती घडवितात: प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांनी अध्यक्षीय भाषणात आजी-आजोबांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, "जसा आजीबाईचा बटवा प्रकृतीला कोणताही त्रास न होता तब्येतीत सुधारणा करतो, तसेच आजी-आजोबांचे संस्कार आपल्याला एक चांगली व्यक्ती बनविण्यात मोठा हातभार लावतात. आजच्या काळात दोन्ही पालक नोकरी करत असलेल्या कुटुंबात मुलांना सांभाळण्याची जबाबदारी आजी-आजोबा चोख पार पाडतात. अशा आजी-आजोबांना आपण किती सन्मान देतो, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. ज्यांनी आपल्याला घडविले त्यांच्याविषयी कृतज्ञ असणे आवश्यक आहे. माणूस म्हणजे केवळ शरीर नव्हे, तर ज्याच्यावर उत्तम संस्कार घडले आहेत ती व्यक्ती होय." घेतलेल्या शपथेचे सर्वांनी मनापासून पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्राध्यापिका स्वाती चौधरी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्राध्यापिका अर्चना सपकाळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील उपप्राचार्य, पर्यवेक्षक यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


