भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील रेल्वे कर्मचाऱ्याच्या खुनाची घटना ताजी असतानाच अवघ्या पंधरवड्यानंतर शहरात पुन्हा एका तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना श्री विसर्जनाच्या दिवशी, मंगळवारी (दि. २५) रात्री उशिरा घडल्याने भुसावळ शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राहुल सदाशिव धांडे (वय ३५, रा. कवठा, ता. अकोट, जि. अकोला) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, पवन अनिल सोनवणे (वय ३०, रा. वरणगाव) याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. वादातून मित्राचा गळा आवळला मिळालेल्या माहितीनुसार, राहुल धांडे आणि संशयित आरोपी पवन सोनवणे हे दोघे मित्र होते. श्री विसर्जनाच्या दिवशी दोघेही सायंकाळपासून सोबत होते. रात्री दोघे जुन्या नगरपालिकेतील विहिरीसमोरील एका खोलीत बसले असताना राहुलने पवनला अश्लील शिवीगाळ केल्याने दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात पवनने राहुलला जमिनीवर जोरात आपटले. त्यानंतर रुमालाने त्याचा गळा आवळल्याने राहुलचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. घटनेनंतर पवन तेथून पसार झाला. मित्राच्या खुनानंतर आरोपी स्वतःहून पोलिसांच्या शरण घटनेनंतर अस्वस्थ झालेला पवन रात्रीच वरणगाव येथे गेला. पोलिसांकडून अटकेची भीती असल्याने त्याने स्वतःहून वरणगाव पोलिस ठाण्यात हजेरी लावली. यावेळी त्याने राहुलचा गळा आवळून तसेच जमिनीवर आपटून खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. वरणगाव पोलिसांनी शुक्रवारी सकाळी ही माहिती भुसावळ बाजारपेठ पोलिसांना दिल्यानंतर पोलिस उपअधीक्षक केदार बारबोले, पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पंधरवड्यात भुसावळात दुसरा खून भुसावळ शहरात अवघ्या पंधरवड्यात खुनाची ही दुसरी घटना आहे. गुरुवार, दि. १० सप्टेंबर रोजी पाटीलमळा परिसरात रेल्वे कर्मचारी तुषार गोविंद सोनवणे (वय ३६, रा. श्रावस्ती नगर, भुसावळ) यांची महिलेशी असलेल्या संबंधाच्या वादातून चॉपरने वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह एका आरोपीचा सहभाग आढळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. या घटनेला पंधरा दिवस पूर्ण होत नाहीत तोच पुन्हा एका तरुणाची हत्या झाल्याने भुसावळ शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चर्चेला उधाण आले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास बाजारपेठ पोलिसांकडून सुरू आहे.


