कुऱ्हा : वाचनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी बाेदवड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ‘साहित्याशी मैत्री करू या’ हा उपक्रम राबवण्यात येताे आहे. त्यात नुकतेच ‘उजेड पेरणारी माणसं’ या आनंदा पाटील लिखित पुस्तकाचे रसग्रहण करण्यात आले. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथील रहिवासी असलेले शिक्षक उमेश खानझाेडे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. ते सन २००९पासून जिल्हा परिषद अंतर्गत अध्यापनाचे काम करीत आहेत. यापूर्वी त्यांनी निफाड जिल्हा परिषदेच्या शाळेतही साहित्य, संस्कृती संवर्धनाच्या अनुषंगाने उपक्रम राबवले आहेत. बाेदवड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतही ते आता विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गाेडी लावण्यासाठी धडपड करीत आहेत. सध्या ‘उजेड पेरणारी माणसं’ हे व्यक्तीचित्रणांचा संग्रह असलेले पुस्तक साहित्य वर्तुळात प्रचंड चर्चेत आहेत. त्याचा आशय आणि विषय शाळकरी विद्यार्थ्यांच्या समाेर यावा म्हणून खानझाेडे यांनी या पुस्तकाचे रसग्रहण केले. या पुस्तकात खान्देशात निर्व्याज भावनेतून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दीपस्तंभांची ओळख करून देण्यात आली आहे. पदकाधीश आंतरराष्ट्रीय धावपटू आर. बी. भवार, पिशवीवालीबाई शैलाताई सावंत, वंचित घटकांती मुलांना एकत्रित करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणारी वैशाली झाल्टे, राजेश्री सुरवाडे, विद्राेही कवी डाॅ. मिलिंद बागुल, आंतरराष्ट्रीय चित्रकार पिसुर्वाे अशा ८४ व्यक्तींच्या कार्याचा धांडाेळा या पुस्तकात घेतला असल्याचे खानझाेडे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक सुनील बडगुजर यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी हा उपक्रम राबवला. शाळेचे मुख्याध्यापक विजय झनके यांचे मार्गदर्शन लाभले. मुखपृष्ठातून सकारात्मक संदेश ‘उजेड पेरणारी माणसं’ पुस्तकाचे मुखपृष्ठ संताेष घाेंगडे यांनी रेखाटले आहे. त्यातील रंगसंगती आणि कुंचल्यांचे फटकारे हे सकारात्मकतेचा संदेश देऊन नवीन ऊर्जा देणारे आहे. पुण्याच्या पेन पब्लिशिंग हाऊसने ही साहित्यकृती प्रकाशित केली आहे. प्रत्येक शाळा, महाविद्यालये आणि वाचनालयांत हे पुस्तक असायला हवे, अशी अपेक्षाही या उपक्रमात शिक्षकांनी व्यक्त केली.


