भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार निता लबडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत तालुक्यातील पाणीटंचाई, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, चारा, शेती पिकांची सद्यस्थिती तसेच आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. नगरपालिका व ग्रामपंचायत हद्दीसह शेतीशिवारात संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन परिस्थितीची पाहणी करावी, तसेच स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात राहून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
हतनूरचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवणार
भुसावळ तालुक्यात सध्या हतनूर धरणात पाणीसाठा उपलब्ध असला, तरी आगामी काळात पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन धरण व तलावातील उपलब्ध पाणी पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री ना. संजय सावकारे यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील २६५ तालुके दुष्काळी घोषित केले असून त्यामध्ये भुसावळ तालुक्याचाही समावेश आहे. सध्या तालुक्यात हतनूर धरणात पाणी उपलब्ध असले, तरी भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने आतापासूनच नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चारा उपलब्ध; गरज भासल्यास शासनाकडून उपाययोजना
भुसावळ तालुक्यात सध्या जनावरांसाठी चारा उपलब्ध असल्याचे सांगत, भविष्यात चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्यास शासनस्तरावर आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती मंत्री सावकारे यांनी दिली.
शेतकऱ्यांना मदतीबाबत बोलताना त्यांनी शासकीय नियमानुसार पात्र शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार असल्याचे सांगितले. दुष्काळासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही तत्परतेने पूर्ण करण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती
बैठकीस गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, भूमी अभिलेख विभाग, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, वन विभाग, महावितरण, लघु पाटबंधारे, मृद व जलसंधारण, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, शिक्षण विभाग यांच्यासह तालुक्यातील मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक उपस्थित होते.
बैठकीत दुष्काळी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेत आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि इतर आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या.


