जळगाव (प्रतिनिधी ) - उत्तर महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातपुड्याच्या कुशीतील प्रसिद्ध श्री मनुदेवी माता मंदिरात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून मनुदेवी माता व रेणुका मातेच्या मूर्तीवरील चांदीचे मुकुट आणि छत्र्या असा एकूण १ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून, भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० ते ७ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने मंदिराच्या मुख्य चॅनेल गेटचे तसेच गाभाऱ्याच्या लाकडी दरवाजाचे कडी-कोंडे तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर गाभाऱ्यातील मनुदेवी माता आणि रेणुका मातेच्या मूर्तीवरील चांदीचे दागिने चोरून नेले. असा आहे चोरीस गेलेला मुद्देमाल मनुदेवी माता मूर्तीवरील चांदीचा मुकुट — वजन ३०० ग्रॅम, किंमत ४० हजार ५०० रुपये. मनुदेवी माता मूर्तीवरील चांदीची छत्री — वजन २०० ग्रॅम, किंमत २७ हजार रुपये. रेणुका माता मूर्तीवरील चांदीचा मुकुट — वजन ३०० ग्रॅम, किंमत ४० हजार ५०० रुपये. रेणुका माता मूर्तीवरील चांदीची छत्री — वजन २०० ग्रॅम, किंमत २७ हजार रुपये. अशाप्रकारे एकूण १ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. मंदिर उघडल्यानंतर प्रकार उघडकीस सकाळी मंदिर उघडल्यानंतर गाभाऱ्याचे दरवाजे तुटलेले आणि मूर्तीवरील दागिने गायब असल्याचे निदर्शनास आले. याबाबत यावल तालुक्यातील आडगाव येथील रहिवासी व शेतकरी शिवाजी प्रभाकर पाटील (वय ५१) यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक २९०/२०२६ नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध बीएनएस कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(डी) अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहेत. लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या मनुदेवी मंदिरातच चोरी झाल्याने भाविक आणि परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


