राहुल गांधींच्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ भुसावळात भाजयुमोचे आंदोलन : पुतळा दहन ;

भुसावळ (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ गुरुवारी भुसावळ शहरात आंदोलन करण्यात आले. नाहाटा चौफुली परिसरात भाजयुमोच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून घोषणाबाजी करत राहुल गांधी यांच्या पुतळ्याचे दहन केले.

आंदोलनादरम्यान भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचा वापर करून देशातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. तसेच अशा प्रकारच्या वक्तव्यांचा निषेध करत संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

या आंदोलनात भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सावळे, जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल महाजन यांच्यासह भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दरम्यान, आंदोलनामुळे परिसरात काही काळ घोषणाबाजी सुरू होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.