व. वा. वाचनालयाच्या १४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध मान्यवरांचा गौरव
जळगाव (प्रतिनिधी) : व. वा. वाचनालयाच्या १४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ग्रंथालय सहायक हर्षदा जाधव यांना उत्कृष्ट ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कारामध्ये रोख २ हजार रुपये आणि स्मृतिचिन्हाचा समावेश आहे. प्रा. चारुदत्त गोखले आणि प्रा. वसंत सोनवणे यांनी अनुक्रमे २ हजार व २ हजार ५०० रुपये देऊन हर्षदा जाधव यांचा गौरव केला. सभेच्या अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष अॅड. सुशील अत्रे होते. यावेळी अनिलकुमार शाह यांनी वाचनालयाच्या कार्याचा आढावा घेतला. आगामी वर्षात रोटरी क्लबच्या सहकार्याने वाचन कट्टा तसेच विद्यार्थ्यांसाठी मराठी वाचन सराव वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अभिजित देशपांडे यांनी आगामी अर्थसंकल्प सादर केला. प्रभात चौधरी यांनी श्रद्धांजली प्रस्ताव मांडला. अॅड. श्रीओम अग्रवाल यांनी नियमावलीतील दुरुस्तीचा ठराव मांडून त्यास मान्यता घेण्यात आली. आयत्या वेळचे विषय प्रा. डॉ. शुभदा कुलकर्णी यांनी मांडले. उत्कृष्ट वाचक व योगदान देणाऱ्यांचा सत्कार नियमित व उत्कृष्ट वाचक म्हणून मनीषा झंवर, कैलास असावा, सदानंद गाडगीळ, रवींद्र कदम आणि अक्षय देशपांडे यांचा ग्रंथ व गुलाब देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वाचनालयासाठी विशेष योगदान देणारे श्रीओम अग्रवाल, डॉ. अपर्णा कासार-भट, मनीष पात्रीकर, प्रणिता झांबरे आणि लीना लेले यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी डॉ. अपर्णा कासार-भट, संगीता अट्रावलकर, अॅड. दत्तात्रय भोकरीकर, प्रा. शरच्चंद्र छापेकर, ललित राणे, योगेश पाटील, मनीष जोशी, शिवाजी भोईटे, विजय पाठक, देवव्रत इनामदार, अरुण सराफ, महेश भांबरे आणि तेजस जोशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


