धुळे : धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील नगावबारी परिसरात धावत्या शिवशाही बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. सुदैवाने चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील ४९ प्रवाशांचे प्राण वाचले. नंदुरबारहून धुळ्याकडे येणाऱ्या शिवशाही बसच्या इंजिनातून धूर निघत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने तातडीने बस रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर कोणतीही घाईगडबड न करता सर्व ४९ प्रवाशांना सुरक्षितपणे बसमधून खाली उतरविण्यात आले. प्रवासी बसमधून बाहेर पडताच काही क्षणांतच आगीने संपूर्ण बसला वेढा घातला. पाहता पाहता बस जळून खाक झाली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली. ઘટનास्थळी संबंधित यंत्रणांनी धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न केले.


