भुसावळ (प्रतिनिधी ) – विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे (बीएलओ) विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) प्रशिक्षण १३ मे रोजी पार पडले. उपविभागीय कार्यालयातील तापी सभागृहात तहसीलदार तथा सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी नीता लबडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.

प्रशिक्षणात मतदार यादी अचूक
करण्यावर भर देण्यात आला. मयत, दुबार आणि स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे तसेच एसआयआर २००२ च्या मतदार यादीशी विद्यमान मतदारांचे मॅपिंग करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मतदारांनी स्थलांतर झाल्यास त्यांची नोंद अद्ययावत करण्याची जबाबदारी स्वतः घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मतदारांनी आपली माहिती तपासण्यासाठी बीएलओंशी संपर्क साधावा, तसेच ईसीआय नेट अॅपमधील
‘बुक कॉल’ सुविधा वापरण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच दुरुस्तीसाठी फॉर्म क्रमांक ८ भरून ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने बीएलओंकडे सादर करता येईल.
प्रशिक्षणात हिरालाल मूलचंदानी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी, खतीब तडवी, श्याम गिरी, सचिन पाटील यांच्यासह अधिकारी व सर्व बीएलओ उपस्थित होते. नागरिकांनी या प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदारांनी केले.


